शिरूर : पिंपरखेड येथे बिबट्याने भरदिवसा केलेल्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे ही साडेपाच वर्षांची बालिका मृत्युमुखी पडली. बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागल्याची गेल्या काही काळातील ही नववी घटना आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

पिंपरखेड येथील शेतकरी अरुण बोंबे यांच्या घरामागील शेतजमीन नांगरणीचे काम सुरू होते. त्यांची नात शिवन्या त्यांना कामाच्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी घेऊन जात असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. शिवन्याला बिबट्याने उचलून शेतात नेल्याचे पाहिल्यावर अरुण उसाच्या शेतात गेेले आणि बिबट्याच्या तावडीतून तिची सुटका केली. जखमी शिवन्याला उपचारांसाठी मंचर येथे नेण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.