पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पाच हजार मतदान केंद्रांची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक त्या जागांची पाहणी करण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. तसेच, मतदारयादीचा घोळ टाळण्यासाठी ‘साॅफ्टवेअर’चा उपयाेग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिली आहे. या प्रभागरचनेनुसार मतदारयादीची विभागणी करणे, मतदान केंद्रांची निश्चिती करणे ही कामे केली जाणार आहेत. यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची बैठक घेतली. यामध्ये बूथनिहाय कामांच्या नियाेजनाविषयी चर्चा झाली. मतदान केंद्रासंदर्भातील जबाबदारी महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी यांच्याकडे देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी शहरात विधानसभा निवडणूक झाली हाेती, त्यावेळी किती आणि काेणती मतदान केंद्रे हाेती. आणखी किती ठिकाणी नवीन मतदान केंद्रे करता येईल. आगामी महापालिका निवडणुकीसाठी साधारणपणे पाच हजार केंद्रांची आवश्यकता असल्याची चर्चा या बैठकीत झाली. तसेच, या मतदान केंद्रांसाठी जागा मिळवणे यासाठीची आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. प्रभाग रचना अंतिम झाल्याने मतदारयादीची विभागणी करावी लागणार आहे.
‘प्रभागनिहाय याद्यांसाठी ‘साॅफ्टवेअर’चा वापर केला जाणार आहे. या कामासाठी पूर्वी मनुष्यबळाचा उपयाेग केला जात हाेता. मात्र, आता ‘साॅफ्टवेअर’चा उपयाेग केल्याने घाेळ टाळता येणार आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी सांगितले. ‘अनेकदा एकाच कुटुंबातील मतदारांची नावे ही वेगवेगळ्या प्रभागांमध्ये येतात. तर, काहींची नावे दुसऱ्या मतदार केंद्रांमध्ये येतात. काही वेळा कुटुंबांतील सदस्यांची नावे वगळली जाण्याचे प्रकार घडतात. हे घाेळ टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येणार आहे,’ असेही अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने तयार केलेल्या प्रारुप प्रभागरचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या हरकती, सूचनांचा विचार करुन काही प्रभागांमध्ये किरकोळ बदल केले असून आठ प्रभागांच्या नावांमध्ये बदल केला आहे. यंदा पहिल्यांदाच अशा पद्धतीने १२ प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तर आठ प्रभागांच्या नावांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.