scorecardresearch

रामनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणीय वनस्पतींचा तरंगणारा तराफा

रामनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणीय वनस्पतींचा तरंगणारा तराफा (फ्लोटिंब बेड) ही एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मांडलेली अभिनव संकल्पना सत्यामध्ये आली आहे.

 पुणे : रामनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणीय वनस्पतींचा तरंगणारा तराफा (फ्लोटिंब बेड) ही एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मांडलेली अभिनव संकल्पना सत्यामध्ये आली आहे. जलशुद्धीकरणासाठी प्रभावी असलेल्या या सोप्या तंत्रज्ञानामुळे पाण्याची प्राणवायूची पातळी वाढण्यास आणि जैवविविधता समृद्ध होण्याची शक्यता वाढली आहे. अतिक्रमण, अस्वच्छता, प्रदूषषण आणि राडारोडय़ाच्या विळख्यात सापडलेल्या रामनदीचे पुनरुज्जीवन व्हावे या उद्देशातून ‘रामनदी पुनरुज्जीवन अभियानां’तर्गत नवनवीन प्रयोग किर्लोस्कर वसुंधरा संस्थेतर्फे केले जात आहेत. या अभियानांतर्गत भुकूम येथील खाटपेवाडी तलावात चार तराफे मंगळवारी (१ फेब्रुवारी) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश राऊत यांच्या हस्ते सोडण्यात येणार आहेत.

खाटपेवाडी येथून सुरू होणारी रामनदी रामेश्वरवाडी, मानस तळे, पाषाण तळे अशी वाहत जाते. या नदीच्या पाण्यामध्ये जड धातूंचे कण मोठय़ा प्रमाणावर आढळले. त्यावर पर्यावरणपूरक उपाय म्हणून एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. राजश्री पटवर्धन आणि ज्ञानेश राठोड यांनी शंतनू बर्वे, निधी कुलकर्णी, पल्लवी गोडबोले, ऋतुपर्णा जोशी, प्रतीक जैन, अक्षय कुमार, किंजल शहा, उर्वी सरपोतदार, सुमंत आपटे आणि अथर्व तोळे या विद्यार्थ्यांच्या मदतीने वनस्पतींचा तरंगणारा तराफा तयार केला. हा तराफा तयार करण्यासाठी पीव्हीसी पाईप एकमेकांना नायलॉनच्या जाळीने जोडून आणि त्यामध्ये हवा भरून तरंगणारी चौकट केली. त्यामध्ये नारळाच्या शेंडय़ा आणि वाळा, कर्दळ यांची रोपे मुळासकट खोवली. असे चार तराफे तयार करून ते खाटपेवाडी येथे रामनदीच्या पाण्यात सोडले. वाळा आणि कर्दळ वनस्पतींची मुळे जड धातू शोषून घेत पाणी शुद्ध करण्यास मदत करतात. या प्रकल्पाच्या चाचण्या पुढील काळातही सुरू राहणार असून प्रकल्पासाठी किर्लोस्कर वसुंधरा संस्थेने निधी दिला, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.

किर्लोस्कर वसुंधराच्या वतीने दरवर्षी रामनदी युवा संसद आयोजित केली जाते. या संसदेमध्ये यंदा आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून रामनदी पुनरुज्जीवित कशी करता येईल या विषयावर विविध महाविद्यालयांनी आपले शोधनिबंध सादर केले होते. त्यातील एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या ‘फ्लोटिंब बेड’ या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले होते.

– वीरेंद्र चित्राव, संयोजक, किर्लोस्कर वसुंधरा

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Floating raft ecological plants prevent pollution ysh

ताज्या बातम्या