पुणे : कृत्रिम फुलांची सजावट करण्याचे वाढते प्रमाण नैसर्गिक फुलांचा वापर करण्याला मारक ठरत आहे. घरामध्ये ऊर्जा निर्माण करणाऱ्या नैसर्गिक फुलांचा सुवास घेत गणरायाची सजावट करावी, हे आपल्या उत्सवातून अभिप्रेत आहे. त्यामुळे कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालून नैसर्गिक फुले फुलविणाऱ्या उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी फुलांच्या व्यापाऱ्यांकडून होत आहे.
धार्मिक समारंभ, उत्सव, घरातील शुभकार्य आणि चातुर्मासातील व्रतवैकल्ये अशा प्रत्येक प्रसंगी फुलांचा वापर हे आपल्या संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. विविध सुवासिक फुलांचे हार आणि तोरण या माध्यमातून सजावट ही प्रत्येक कार्यक्रमाची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी नैसर्गिक फुलांचा वापर करण्याऐवजी अनेकदा कृत्रिम फुलांचा वापर करण्यावर भर दिला जातो. त्याचा फटका फुलांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या उत्पादकांना बसत आहे. हे ध्यानात घेऊन कृत्रिम फुलांच्या वापरावर राज्य शासनाने बंदी घालावी, अशी मागणी फूल उत्पादक व्यापाऱ्यांकडून होत आहे.
‘यापूर्वी प्लास्टिक फुलांचा वापर करून सजावट केली जात होती. मात्र, आता कागदी, कापडी, सॅटिन आणि लोकर अशा साहित्याचा वापर करून कृत्रिम फुलांची निर्मिती केली जात असून, गेल्या काही वर्षांत त्याची बाजारपेठ वाढत आहे. कृत्रिम फुलांचा वापर करून केली जाणारी सजावट हा विषय केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही तर, घरातील शुभकार्याप्रसंगी कृत्रिम फुलांची सजावट करण्याकडे कल वाढला आहे. फूल उत्पादक शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका ध्यानात घेऊन शासनाने कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे,’ असे मार्केट यार्ड येथील फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
मार्केट यार्ड फूल बाजारामध्ये जिल्ह्यातील १५ ते २० हजार शेतकरी आपली फुले विक्रीसाठी पाठवतात. बाजारात झेंडू, शेवंती, गुलछडी, ॲस्टर, डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशियन यांसह विविद प्रकारची फुले आणि पाने विक्रीसाठी येतात. सजावटीमध्ये कृत्रिम फुलांचा वापर वाढल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांना रास्त दर मिळत नाही. दर मिळत नसल्याने बाजारपेठेमध्ये फुलांची आवक जवळपास ५० टक्क्यांनी घटली आहे.- सागर भोसले, फुलांचे व्यापारी, मार्केट यार्ड
सजावट करण्यासाठी कृत्रिम फुलांमध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या फुलांचा वापर केला जातो. अशा फुलांच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा दर्जाही चांगला नसतो. त्यामुळे या फुलांचे आयुष्यदेखील मर्यादित असते. हे प्लास्टिक पुनर्वापराच्या प्रक्रियेमध्ये येत नाही.- डाॅ. गुरुदास नूलकर, पर्यावरण अभ्यासक