पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीने फूल बाजारातील प्रतीक्षा यादी डावलून ५६ जणांना नव्याने परवाने दिल्याने फूल बाजार अडते आणि व्यापारी संघाकडून मंगळवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन केले. प्रशासनाने हे परवाने त्वरित रद्द करून प्रतीक्षा यादीतील फूल व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी अडते संघाकडून करण्यात आली.
फूल बाजार अडते आणि व्यापारी संघाचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी फूल बाजारातील अडते अंकुश शेलार, विजय हिंगणे, भुजंग शेवाळे, अनंत माने, खंडू जगताप, मधुसूदन भोसले, संभाजी भुरडे, सूर्यकांत काळभोर, सचिन पवार उपस्थित होते. या वेळी फूल बाजारातील अडत्यांकडून बाजार समितीतील अधिकारी मंगेश पठारे यांना निवेदन देण्यात आले.
‘गेले ३० वर्षे फूल व्यापाऱ्यांसाठी जागेची मागणी करण्यात येत आहे. फूल बाजारातील जागा कमी आहे. नवीन फूल बाजारात जागा वाढवून देऊ, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, संचालक मंडळाने प्रतीक्षा यादी डावलून नातेवाईकांना जागांचे वाटप केले. नवीन फूल बाजार तीन ते साडेतीन महिन्यांत सुरू करू, असे आश्वासन पणन मंत्र्यांनी दिले होते. गाळ्यांचे वाटप न झाल्यास लोकशाही मार्गाने गाळ्यांचा ताबा घेऊन व्यापार सुरू केला जाईल’, असा इशारा आप्पा गायकवाड यांनी दिला.
बाजार समितीच्या फूल बाजारात १९९० पासून जे अडते व्यापार करत आहेत. त्यांना लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी. नवीन जागेतील फूल बाजार लवकर सुरू करण्यात यावा. जे अडते १९९० पासून कार्यरत आहेत. त्यांना प्राधान्य द्यावे. व्यापारासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून द्यावी. प्रतीक्षा यादीतील फूल व्यापाऱ्यांना जागा द्यावी, असे फूल बाजार अडते संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.