पुणे : गौरीचे आगमन रविवारी (३१ ऑगस्ट) होणार असून, बाजारात फुलांची मोठी आवक झाली आहे. मंडई, तसेच मार्केट यार्डातील फूल बाजारात खरेदीसाठी शनिवारी गर्दी झाली. फुलांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गौरी आगमनानिमित्त पूजा साहित्य, तसेच फुले खरेदीसाठी शनिवारी मंडई, हुतात्मा बाबूगेणू चौक परिसरात शनिवारी गर्दी झाली होती. सजावट आणि हार तयार करण्यासाठी लागणाऱ्या फुलांना मागणी वाढली असून, फुलांच्या दरात नेहमीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
मार्केट यार्डातील फूल बाजारात नेहमीच्या तुलनेत फुलांची आवक वाढली. पुणे जिल्ह्यासह सातारा, सोलापूर जिल्ह्यातून फुलांची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातार परिसरात पाऊस सुरू आहे. पावसामुळे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आलेली फुले भिजलेली आहे. भिजलेली फुले तुलनेने लवकर खराब होतात. त्यामुळे या फुलांना कमी मागणी असून, दर कमी मिळाले आहेत.
सुक्या फुलांना चांगले दर मिळाले आहेत. घरगुती ग्राहक, हार, तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून मागणी जास्त आहे. त्यामुळे या फुलांना भाव जास्त मिळत आहे. गणेशोत्सव, गौरी आगमनानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ होते. मात्र, पावसामुळे फुलांच्या आवकेवर परिणाम झाला आहे, असे भोसले यांनी सांगितले.
गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची मोठी आवक होते. ग्राहकांकडून फुलांना चांगली मागणी आहे. गौरी विसर्जनानंतर फुलांची मागणी निम्म्याने कमी होते. – सागर भोसले, फूल व्यपारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड
घाऊक बाजारात प्रतिकिलो फुलांचे दर
शेवंती – १५० ते ३५०
गुलछडी- ५०० ते १५००
बिजली -१५० ते २५०
झेंडू – ६० ते १५०
गुलाब (२० नग) – १०० ते २००
जर्बेरा (१० नग) – ८० ते १५०
आर्केड (२० नग) – ५०० ते १०००
ग्लॅडिओ (१० नग) – १०० ते १५०
सुर्यफुल (५ नग ) – ८० ते १५०