विद्यार्थी, नोकरदारांच्या खाण्याचे हाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : करोनाच्या प्रतिबंधासाठी लागू के लेल्या निर्बंधातून खाद्यपदार्थांची घरपोच सेवा देण्यास पुण्यातही परवानगी देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबई महापालिके कडून खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेस परवानगी दिली जाते, तर पुण्यात का नाही, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महापालिके च्या कठोर निर्बंधांमुळे विद्यार्थी, नोकरदारांच्या खाण्याचे हाल होत आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यात सायंकाळी सहा ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसभरात हॉटेल, खाणावळीतून के वळ पार्सल नेण्यास मुभा देण्यात आली आहे. सायंकाळी सहानंतर पार्सल नेण्यासही परवानगी नाही. मात्र मुंबई महापालिके चे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी घेतलेल्या निर्णयानुसार खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईत खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सेवा २४ तास सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातही खाद्यपदार्थ घरपोच देण्याच्या सेवेला परवानगी देण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे.

स्पर्धा परीक्षा आणि अन्य विविध अभ्यासक्रमांसाठी अनेक विद्यार्थी पुणे आणि परिसरात वास्तव्य करतात. तसेच एकटे राहणाऱ्या नोकरदारांचीही संख्या लक्षणीय आहे. मात्र प्रशासनाच्या कठोर निर्बंधांमुळे विद्यार्थी, नोकरदारांच्या रात्रीच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला  आहे. त्यामुळे किमान खाद्य  पदार्थ घरपोच देण्याची सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच टाळेबंदीनंतर हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय क्षमतेच्या ५० टक्के  ग्राहकांना प्रवेश देऊन सुरू होता. त्यामुळे हॉटेल व्यवसाय सुरू राहण्यासाठी खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सेवा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबईमध्ये घरपोच खाद्यपदार्थ सेवेला परवानगी मिळाली, त्याच धर्तीवर पुण्यातही परवानगी मिळाली पाहिजे. सद्य:स्थितीत नागरिकांची प्रचंड अडचण होत आहे. अनेक कु टुंबे करोनाग्रस्त असल्याने त्यांच्याकडे घरकामगार जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कु टुंबांची, ज्येष्ठ नागरिकांची, विद्यार्थी, एकट्या राहणाऱ्या नोकरदारांच्या जेवणाची मोठी समस्या आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून घरपोच खाद्यपदार्थ सेवेला परवानगी दिली पाहिजे. घरपोच खाद्यपदार्थ सेवेला परवानगी मिळण्याबाबत निवेदनही प्रशासनाला दिले आहे. करोना प्रतिबंधासाठीची आवश्यक ती सर्व काळजी घेऊन सेवा दिली जाईल.

– किशोर सरपोतदार, सचिव, पुणे रेस्टॉरन्ट्स अँड हॉटेलिअर्स असोसिएशन (प्राहा)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food delivery service should also be allowed in pune akp
First published on: 08-04-2021 at 00:04 IST