लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. सर्व प्रकारच्या फुलांचे दर सलग दुसऱ्या आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढले आहेत. लग्न समारंभात सजावटीसाठी फुलांचा वापर केला जातो. किरकोळ बाजारातील फूल व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्व प्रकारच्या फुलांच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

घाऊक बाजारात झेंडू प्रति किलो १० ते ५० रुपये, गुलछडी प्रति किलो ७० ते १२० रुपये, अस्टरची जुडी २० ते ३० रुपये, अस्टर सुट्टा १०० ते १८० रुपये किलो, कापरी १० ते ४० रुपये, शेवंती १०० ते १२० रुपये प्रति किलो, गुलाब गड्डी २० ते ५० रुपये, डच गुलाब १०० ते २०० रुपये, जर्बेरा ५० ते ८० रुपये प्रति किलो, कार्नेशियन १५० ते २०० रुपये प्रति किलो, शेवंती काडी- १५० ते २५० रुपये, लिलियम (१० काड्या)- १००० ते १२०० रुपये, ऑर्किड ४०० ते ५०० रुपये प्रति किलो, ग्लॅडिओ- ८० ते १२० रुपये (१० काड्या), जिप्सेफिला १५० ते ३०० रुपये प्रति किलो, मोगरा २५० ते ३५० रुपये प्रति किलो या दराने विकली जात असल्याची माहिती फुलांच्या व्यापाऱ्यांनी दिली.