अनेक वर्षांपासून रखडलेल्या वेतनवाढ करारासह विविध मागण्यांसाठी आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीतील कामगारांच्या कुटुंबीयांनी सुरू केलेल्या आंदोलनाने मंगळवारी उग्र स्वरूप धारण केले. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कंपनी व्यवस्थापनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या भावनेतून आंदोलकांनी कंपनीवर भव्य मोर्चा काढला. या वेळी पोलिसांची कुमक मागवण्यात आली. प्रवेशद्वाराजवळ झालेली आक्रमक भाषणे व आंदोलकांच्या घोषणांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काळभोरनगर येथे फोर्स मोटर्सच्या कामगारांच्या कुटुंबीयांचे आंदोलन सुरू आहे. दोन कामगार संघटनांतील वादातून वेतनवाढ लांबल्याचे सांगत कंपनी व्यवस्थापनाने त्याची दखल घेतली नाही. स्थानिक नेते व सामाजिक संस्थांनी आंदोलनाला पािठबा दिला. कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी भेट देऊन दोन दिवसांत तोडगा काढू, अन्यथा आपणही उपोषणात सहभागी होऊ, असे आश्वासन दिले. कंपनीने मंत्र्यांनाही जुमानले नाही आणि त्या आश्वासनाचा त्यांनाही विसर पडला. राजकीय नेते येतात आणि पोकळ आश्वासने देऊन जातात म्हणून आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी कंपनीवर मोर्चा काढला. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी झाली. नगरसेवक दत्ता साने, माजी नगरसेवक मारुती भापकर, यशवंत भोसले, मानव कांबळे, भरत िशदे आदींसह मोठय़ा संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. कामगार संघटनांमधील वादामुळे वेतनवाढ करारास विलंब झाल्याचे सांगत या आंदोलनातून काही अनिष्ट प्रकार घडल्यास त्याला कंपनी जबाबदार राहणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2015 रोजी प्रकाशित
वेतनवाढ कराराच्या मागणीसाठी आकुर्डीत फोर्स मोटर्स कंपनीवर मोर्चा
दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कंपनी व्यवस्थापनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या भावनेतून आंदोलकांनी कंपनीवर भव्य मोर्चा काढला.

First published on: 18-03-2015 at 02:52 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Force motor co payment agreement morcha