पुणे : जी-२० ‘डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट’ बैठकीसाठी पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी पालखी सोहळ्याला हजेरी लावत महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा ‘याची देही याची डोळा’ अनुभवली.तसेच काही प्रतिनिधींनी श्री संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेतले.

पालकमंत्री चंदकांत पाटील यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज पादुका मंदिरजवळ फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वार येथे जी-२० प्रतिनिधींसाठी पालखी सोहळा अनुभवण्यासाठी मंडप उभारून प्रशासनाच्या आणि पुणे महानगर पालिकेच्यने व्यवस्था केली होती. पाटील यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले. या वेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात आणि तुळशीमाळा, वारकरी उपरणे, टोपी घालून प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. पालखी रस्त्यावरून दिंड्यांचे आगमन होऊ लागले. हाती भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीची रोपे, कपाळाला टिळा, टाळ, मृदंग, वीणा वादनात, ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोषात, अभंग गायनात, फुगडी, नर्तनात दंग वारकरी पाहून प्रतिनिधी वेगळ्याच अनुभवात दंग झाले. या वेळी काही प्रतिनिधींनी वारकऱ्यांकडून कपाळाला टिळा लावून घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ढोल ताशाच्या तालावर काही प्रतिनिधी नर्तनात दंग झाले. काही प्रतिनिधींनी उत्साहाने वारकऱ्यांसोबत फुगडीचा फेर धरला. महिला प्रतिनिधींनी डोक्यावर तुळशीची रोपे घेतली. सर्वांनी मोबाईलमध्ये वारीची छायाचित्रे काढली. प्रतिनिधींनी वारकऱ्यांना भारतीय पद्धतीने नमस्कार केला. तत्पूर्वी केशव शंखनाद पथकाद्वारे करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शंखनादाचा तसेच ढोल पथकाच्या ढोल वादनाने वातावरणात जोश आणला.