पुणे : जी-२० बैठकीसाठी आलेल्या विविध देशांतील प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती. शनिवारवाडा, लाल महालाचा इतिहास जाणून घेतल्यावर परदेशी पाहुणे स्तिमित झाले.

पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून शनिवारवाड्यापासून या वारसा स्थळ भेटीची सुरूवात झाली. शनिवारवाड्याची भव्यता, प्रवेशद्वार, विस्तारलेला परिसर प्रतिनिधींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. लाल महल येथे राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर त्यामागचा इतिहासही त्यांनी जाणून घेतला. भेटीच्या अखेरच्या टप्प्यात प्रतिनिधींनी नाना वाडा येथे भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला.

हेही वाचा >>> पिंपरी : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह चौघांवर गुन्हा

शनिवार वाडा येथे पिंगळा, वासुदेव, पारंपरिक गोंधळी कलाकारांनी कलेचे, संबळ, हलगीचे सादरीकरण करण्यात आले. गोंधळी बांधवांनी संकेतभाषा कला असलेली करपल्लवीचे सादरीकरण करत बोटांच्या संकेतातून पाहुण्यांची नावे ओळखून दाखवली. पारंपरिक कुंभार कलेअंतर्गत चाकावर मातीची भांडी करण्याची कला प्रदर्शित करण्यात आली. या वेळी पाहुण्यांना नंदीबैलही पाहता आला. पाहुण्यांनी या कलाकारांसोबत, नंदीबैलासोबत छायाचित्रे, मोबाईलद्वारे सेल्फी काढून घेतल्या.

हेही वाचा >>> ‘मावळ’ लोकसभा मतदारसंघात रायगडचा उमेदवार? भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित आपटे, संदीप गोडबोले, सुप्रिया शेलार यांनी पाहुण्यांना पुण्याचा इतिहास आणि वारसा स्थळांबाबत माहिती दिली. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते. ही वारसासहल आयोजित केल्याबद्दल परदेशी पाहुण्यांनी प्रशासनाचे आभार मानले.