लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : घरामागच्या अंगणात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोनदा हुलकावणी दिली. अखेर विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. आर्वी (ता. जुन्नर) प्रकाश दत्तात्रय डोंगरे यांच्या घरी रविवारी बिबट्याचा थरार अनुभवण्यास मिळाला.

डोंगरे यांच्या घराच्या मागच्या पटआंगणामध्ये बिबट्या दबा धरून बसला असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाला तातडीने कळविण्यात आले. वन विभागाचे कर्मचारी आणि प्रकाश डोंगरे यांच्या साथीदारांच्या मदतीने बिबट्यास पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दोन वेळेस हुलकवणी देत बिबट्या प्रकाश डोंगरे यांच्याच घरामागील विहिरीत अडकला. तेथेच वन विभागाला बिबट्यास जेरबंद करण्यास यश आले. बिबट्या जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा-“उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे बना, त्यात…”, मनोज जरांगे यांचे आवाहन; म्हणाले, “मराठा समाजात…”

दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून रात्री आणि दिवसादेखील घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे, याकडे लक्ष वेधून डोंगरे यांनी बिबट्यास तातडीने जेरबंद केल्याबद्दल वन विभागाचे आभार मानले.