पुणे : मुळातच दुबळ्या असलेल्या पक्षांतरबंदी कायद्यामुळे राज्यातील कौटुंबिक पक्षांची परिस्थिती काय झाली आहे, हे दिसतच आहे, असे मत व्यक्त करून पक्षांतरबंदी कायदा रद्द करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.

‘पुणे पत्रकार कट्टा’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, लेखिका इंदुमती जोंधळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्यविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, सरहद संस्थेचे संजय नहार, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, गिरीश अवघडे, डॉ. नीरज जाधव, डॉ. भगवान घेरडे या वेळी उपस्थित होते. ‘यूपीएससी’ परीक्षेत यश संपादन केलेल्या शिवांश जागडे यांचा सत्कार करण्यात आला.

चव्हाण म्हणाले,‘‘सेपरेशन ऑफ पॉवर’चे तत्त्व पक्षांतरबंदी कायद्याने गळून पडले. राज्यातील कौटुंबिक पक्षांची परिस्थिती काय झाली आहे, हे दिसतेच आहे. राजीव गांधी यांनी चांगल्या उद्देशाने पक्षांतरबंदी कायदा आणला. त्यात अटलबिहारी वाजपेयी यांनी मोठे बदल केले. आता या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होतो आहे. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा रद्द करायला हवा.

‘लोकशाहीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न पडतो. देशात लोकशाहीचा केवळ ढाचा राहिला असून प्राण निघून जातो आहे. देशाच्या घटनेत असलेले ‘चेक अँड बॅलन्सेस’ हे तत्त्व प्रत्यक्षात दिसत नाही. देशाच्या नेतृत्वाकडून लोकशाहीची हत्या होत आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून हातभार लावला जातो आहे,’ असे चव्हाण यांनी सांगितले.वैष्णवी सुळके आणि शिवनैैना सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. उद्धव धुमाळे यांनी आभार मानले.

सिमला कराराचे काय झाले?

सिमला करारात भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांतील समस्या इतर कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय चर्चेच्या माध्यमातून सोडवायच्या, असे ठरले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिल युद्धावेळी हे तत्त्व सोडले नाही. मात्र, आता अमेरिकेची मध्यस्थी सरकारने मान्य केलेली दिसते. त्यामुळे सिमला करारात काही बदल करण्यात आले आहेत का, हे सरकारने स्पष्ट करावे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.