पुणे : मेट्रोच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यावर महामेट्रोकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मेट्रोच्या कामांची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी हैदराबाद मेट्रोचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी केली आहे.

याबाबत गाडगीळ यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना १ नोव्हेंबरला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मेट्रोच्या कामांबाबत अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावर महामेट्रोकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आलेली नाहीत. यावर खुली चर्चा करण्याची मागणी आम्ही केली होती; परंतु महामेट्रोने त्यास नकार दिला.

हेही वाचा – पुणे : ताराचंद रुग्णालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात आग

मेट्रोच्या कामांचा दर्जा, सुरक्षितता आणि व्यवस्थापन यात अनेक त्रुटी आहेत. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने स्ट्रक्चरल ऑडिट नव्हे, तर केवळ तपासणी केली आहे. याचबरोबर महालेखापालांच्या (कॅग) अहवालातही मेट्रोच्या कामकाजावर अनेक ताशेरे ओढण्यात आले होते. पुण्याचा नागरिक म्हणून मेट्रोच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. कारण हा प्रश्न नागरिकांच्या सुरक्षिततेशी निगडित आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाची तटस्थपणे चौकशी करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात, असेही गाडगीळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ललित पाटीलवर मोक्का कारवाई; ससूनच्या अधिष्ठातांवरदेखील मोक्का कारवाई झाली पाहिजे – आमदार रविंद्र धंगेकर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पायाभूत सुविधा प्रकल्प हे राष्ट्रीय संपत्ती असतात. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे ते साधन असतात. त्यामुळे देशहिताच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळणे आवश्यक आहे. – विवेक गाडगीळ, माजी व्यवस्थापकीय संचालक, हैदराबाद मेट्रो