सध्याचे पुढारी एकमेकांची लक्तरे काढण्यातच धन्यता मानत आहेत, अशी खंत माजी आमदार उल्हास पवार यांनी मोशीत बोलताना व्यक्त केली.इंद्रायणी साहित्य परिषद आणि मोशी ग्रामस्थ आयोजित इंद्रायणी साहित्य संमेलनात पवार यांची मुलाखत जगन्नाथ शिवले यांनी घेतली. यावेळी बोलताना पवारांनी राजकारण, जातीयवाद, वारकरी संप्रदाय, सध्याची राजकीय परिस्थिती अशा विविध विषयांवर परखड मते व्यक्त केली.

हेही वाचा >>>पुणे: नवले पूल परिसर अपघातमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांची एकत्रित बैठक बोलवा; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पवार म्हणाले, एखाद्या वादामध्ये चांगल्या शब्दांची पेरणी केली तर त्या वादाचेदेखील सौंदर्य वाढते. वादाला संवादाची साथ असल्यास त्यातून परिसंवाद घडू शकतो आणि वितंडवादावर विजय मिळवला येऊ शकतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांना तत्कालीन परिस्थितीत त्रास देणाऱ्या प्रवृत्ती आजही समाजात आहेत. मात्र, त्या वेगवेगळ्या वेषात आहेत. सध्याच्या युगात माणूस मोबाइलच्या आहारी गेला आहे. चार तासांच्या प्रवासात आपण शेजारच्या व्यक्तीशी बोलतही नाही. तंत्रज्ञानाच्या अतिवापराला पायबंद बसला पाहिजे, असे ते म्हणाले.या वेळी उल्हास पवार यांच्या हस्ते लेखक अरुण बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या ‘अक्षर प्रतिभेतील प्रज्ञावंत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. संतोष बारणे यांनी स्वागत केले. सोपान खुडे यांनी आभार मानले.