पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनीच तब्बल ३ कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याचे उघडकीस आले आहे. महापालिकेने राणे यांच्या मालकीच्या ‘आर डेक्कन’ या बहुउद्देशीय व्यापारी संकुलातील हॉटेल लाखबंद केले. राणे यांच्यावर महापालिकेने केलेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदारांच्या निवासस्थान आणि मिळकतींपुढे बॅण्ड वाजविण्यात येत आहे. डेक्कन येथे राणेंच्या मालकीच्या बहुउद्देशीय व्यापारी संकुलाची पाच कोटी ६० लाख रुपये थकबाकी होती, त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये एका मजल्याची थकबाकी भरण्यात आली. उर्वरित दोन मजल्यांची तीन कोटी ७७ लाख रुपये थकबाकी भरावी, यासाठी प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, राणे यांच्याकडून थकबाकी भरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे या इमारतीतील हॉटेल लाखबंद करण्यात आले.
हेही वाचा >>>मैत्रिणीने ‘इंस्टाग्राम’ वर मॅसेज करुन भेटायला बोलविले आणि….
शहरात अनेकांनी मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे महापालिकेकडून मालमत्ता कराच्या वसुलीसाठी संबंधित मालमत्ता लाखबंद करण्यात येत आहेत. त्यासाठी पाच पथके नेमण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बँड वाजवून थकबाकी वसूल करण्यावर भर देण्यात येत आहे. राणे यांच्या मालमत्तेचा कोट्यवधींचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राणे यांच्या हॉटेलवर कारवाई झाली आहे.
शहरात दिवसभरात १६ मिळकती लाखबंद करून सुमारे आठ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. ‘आर-डेक्कन’ या बहुउद्देशीय व्यापारी संकुलातील हॉटेलची तीन कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल सीलबंद करण्यात आले. असे कर आकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.