पिंपरी : जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणण्यासाठी सुनेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या प्रकरणात पसार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुळशीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व त्यांचे चिरंजीव सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ‘मुसक्या आवळून हगवणे याला अटक करा,’ असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पसार झालेल्या हगवणे पिता-पुत्राच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली आहेत.
हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम) हिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे (वय ५१, रा. वाकड) यांनी बावधन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघे पसार आहेत. राजेंद्र आणि सुशील या दोघांचीही राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती ‘राष्ट्रवादी’चे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
‘माझा काय संबंध?’
‘मला अनेक जण लग्नाला बोलावतात. मीही शक्य असेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या लग्नाला मी गेलो आणि पुढे त्या सुनेला सासरकडून काही वेडेवाकडे झाले तर त्यात ‘अजित पवार’चा काय संबंध येतो,’ असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केला. ‘वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येची घटना समजल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून कोणीही असला, तरी कारवाई करा, असा आदेश दिला आहे. या प्रकरणात पती, सासू, नणंद यांना अटक झाली आहे. सासरा पळाला असला तरी तो पळून-पळून कुठे जाणार आहे? मुसक्या आवळून त्याला अटक करा,’ असे अजित पवार म्हणाले.
‘राजकीय पार्श्वभूमी न पाहता कारवाई करा’
‘कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला, तरी त्याला गुन्हा करण्याचे प्रमाणपत्र दिलेले नाही. राजकीय पार्श्वभूमी न पाहता पोलिसांनी कारवाई करावी,’ असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. सामंत यांनी वाकड येथे वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. दरम्यान, ‘वैष्णवीला न्याय देण्यासाठी सरकार मदत करेल. या प्रकरणात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे योग्य ती कारवाई करतील,’ असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. त्यांनीही वैष्णवीच्या पालकांची भेट घेतली.
या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपी शशांक हगवणेसह तिघांना अटक केली आहे. दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पाच तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल.-विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचव