श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे क्रिकेट समालोचक कुमार संगकारा यांच्यावर पुण्यातील रुबी हॅाल क्लिनिकच्या हिंजवडी येथील विभागात यशस्वी उपचार करण्यात आले. नुकत्याच झालेल्या भारत-श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी संध्याकाळी अचानक अंग थरथरत असल्यामुळे त्यांना हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात आले होते.
हेही वाचा- ‘द्रोह असेल तर गुन्हा दाखल करा’; अजित पवार यांचे आव्हान
संगकाराच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याचे (डिहायड्रेशन) तसेच ताप यामुळे त्यांना थकवा असल्याचे निदान करण्यात आले. गुरुवारी झालेल्या एक दिवसीय सामन्यापूर्वी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. श्रीधर देशमुख म्हणाले, घरीच डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. त्यांना थंडी, डोकेदुखी, आतड्यांमध्ये दाह आणि ताप आल्याचे दिसून आले. त्यांच्या शरीरातील पाणीही कमी झाले होते. म्हणून उपचारांसाठी त्यांना दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
संगकारा म्हणाले, रुग्णालयातील वास्तव्यादरम्यान माझी उत्तम काळजी घेण्यात आली. त्यामुळेच मी रुग्णालय, डॅाक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असेही संगकारा म्हणाले.