पुणे : पिस्तूल परवाना आणि सुरक्षारक्षक मिळण्यासाठी स्वतःच्या मोटारीवर गोळीबार घडवून आणणाऱ्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) युवा सेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश घारे याच्यासह चौघांना न्यायालयाने शनिवारपर्यंत (३१ मे) पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यात घारे (वय ३८, रा. वारजे) याच्यासह सचिन अनिल गोळे (वय २७), शुभम संपत खेमनार (वय २७) आणि अजय ऊर्फ बगली रवींद्र सकपाळ (वय २५, तिघेही रा. वारजे माळवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. तर, गोळीबार करणारा संकेत प्रभाकर मातले (वय २६, रा. कोल्हेवाडी) या फरार आरोपीला अटक झाली असून त्याला शुक्रवारपर्यंत (३० मे) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोळे, खेमनार आणि सपकाळ यांना रविवारी (२५ मे) अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (२९ मे) पोलीस कोठडी सुनावली होती. या तिघांसह घारेला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. वारजे माळवाडी पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या तपासात गोळीबाराचा बनाव रचला गेल्याचे समोर आले. घारे यांनी त्यांना पिस्तूल परवाना मिळावा व पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी हा बनाव रचला गेल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी हा गुन्हा नेमका कोणत्या कारणासाठी केला आहे, याबाबत सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा आहे. गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले पिस्तूल जप्त करायचे बाकी आहे. आरोपींनी ते पिस्तूल कोठून आणले, याचा तपास करण्यात येत आहे. या सर्व तपासासाठी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद वकील नीलिमा इथापे यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.