भारतीय खाद्य महामंडळात नोकरीच्या आमिषाने चार लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सौरव शर्मा (रा. अमानोरा पार्क, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अशोक सीताराम मानवलकर (वय ५८, रा. बिवी, ता. लोणार, जि. बुलढाणा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानवलकर यांची शर्मा याच्याशी काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती.

हेही वाचा >>>पुणे: पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले; हडपसर परिसरातील घटना

मानवलकर यांची मुलगी अनुराधा हिला भारतीय खाद्य महामंडळात (फूड काॅर्पाेरेशन ऑफ इंडिया) नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. मानवलकर यांच्याकडून शर्माने चार लाख ३९ हजार रुपये घेतले. त्यानंतर नोकरीबाबत मानवलकर यांनी शर्मा याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मानवलकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गोसावी तपास करत आहेत.