पिंपरी : ‘ड्राय डे’ (मद्य विक्रीस बंदी) असताना आणि मद्य विक्रीचा कोणताही वैध परवाना नसताना मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह व्यवस्थापक आणि जागा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हिंजवडी, साखरेवस्ती येथील एका हॉटेलवर करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई अजित शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि जागा मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालक तसेच व्यवस्थापक यांनी ‘ड्राय डे’ असताना आणि मद्य विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेलमध्ये ४४ हजार ८६५ रुपये किमतीची मद्य विक्री करताना ते आढळून आले. तसेच, हॉटेल मालकाकडे मद्य विक्रीचा वैध परवाना नाही हे माहित असताना देखील जागा मालक आरोपींनी त्यांची जागा हॉटेल चालवण्यासाठी आणि मद्य विक्रीसाठी भाड्याने उपलब्ध करून दिली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
किरकोळ वादातून मारहाण
खोलीमधील सहकाऱ्याच्या पत्नीला धक्का दिल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना हिंजवडीत घडली.
या प्रकरणी ३० वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला बोलावून घेऊन सहकाऱ्याच्या पत्नीला धक्का का दिला, अशी विचारणा केली. त्यानंतर आरोपींनी हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीवर, पायावर, डोक्याच्या पाठीमागे आणि मानेवर मारहाण करून त्यांना जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू
निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने कंटेनर चालवून दुचाकीला मागून धडक दिल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथे घडली.
दक्ष दुर्गेश सोळंकी (१८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या वडीलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनरचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा दक्ष हा दुचाकीवरून कामशेतकडून पिंपरीकडे येत होता. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या चालकाने कंटेनर निष्काळजीपणे, बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने चालवून दक्षच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दक्षला पोटाला व उजव्या कमरेला मार लागला. त्यात गंभीर जखमी झालेल्या दक्षचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाला शिरगाव पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई पाचाणे गावाचे हद्दीत करण्यात आली.
राकेश मधुकर रेणसे (३५, पाचाणे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई दिलीप राठोड यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक वर्षाच्या कालावधीकरिता पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचे आदेश असतानाही, त्याने कोणतीही परवानगी न घेता हद्दीत वावरत असताना त्याला पकडण्यात आले. तसेच, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता आढळून आला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
पैशांवर जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
पैशांवर जुगार खेळणाऱ्या चार व्यक्तींना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पकडून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई वासुली रोडवर करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई राजकुमार हनुमंते यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ‘काळा पिवळा पाच स्टार कार्ड’ नावाचा जुगार खेळताना आणि चालवताना मिळून आले. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
