पुणे : शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनेत तब्बल ३१ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी सहकारनगर आणि चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठासह त्यांच्या मुलीला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो अशी बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यानंतर त्यांना १९ लाख ५० हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. परतावा न देता सायबर चोरट्यांनी त्यांची फसवणूक केली. ही घटना ९ ते १५ सप्टेंबर कालावधीत धनकवडी येथे घडली.  याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करीत आहेत.  

ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याचे आमिष तरुणाला ११ लाख ५७ हजार रूपयांना पडले. सायबर चोरट्यांनी संबंधित तरूणाला प्रीपेड टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार तरूणाने ११ लाख ५७ हजारांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्यासोबतच संपर्क बंद करून फसवणूक केली. ही घटना २५ एप्रिल ते १ मे कालावधीत खराडी येथे घडली असून, २४ वर्षीय तरूणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.