पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विमानतळ आणि मुंढवा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण विमाननगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले होते. त्यानंतर तरुणाने काही रक्कम गुंतविली.
चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यात परताव्यापोटी काही रक्कम जमा केली. परतावा मिळाल्याने तरुणाला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगण्यात आले. त्यानंतर चोरट्यांच्या खात्यात तरुणाने आठ लाख ४९ हजार रुपये जमा केले. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले, तसेच त्याला परतावाही दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे तपास करत आहेत.
अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी मुंढवा भागातील एकाची पाच लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी तक्रारदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याची फसवणूक केली. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करत आहेत.