लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच… परंतु पिंपरी-चिंचवड शहरात आंब्याचे वन नसले तरी दुर्गा टेकडी परिसरात असलेल्या अनुकूल नैसर्गिक वातावरणात मोर चांगलेच रमले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडीतील दुर्गादेवी टेकडी उद्यानात मोराची जोडी मुक्‍त संचार करताना नागरिकांना दिसून येत आहे. मोरांनी फुलवलेल्या पिसाऱ्याचे हे विलोभनीय दृश्‍य महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात दोनशे पेक्षा अधिक उद्याने विकसित केली आहे. या उद्यानांमध्ये नागरिक सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येतात. निगडी, प्राधिकरण परिसरात महापालिकेने दुर्गादेवी टेकडी विकसित केली आहे. या टेकडीवर मोठ्या प्रमाणात देशी वृक्षासह विदेशी वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. दुर्गादेवी टेकडीवर विविध पक्षांचे वास्तव्य आहे.

आणखी वाचा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पिंपरी महापालिका नोंदी शोधणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांपासून या घनदाट वृक्षांमध्ये मोरांचा वावरही सातत्याने आढळून येत आहे. दोन दिवसांपूर्वी मोराच्या जोडीचा उद्यानात मुक्त संचार दिसून आला. मोरांनी फुलवलेल्या पिसाऱ्याचे हे विलोभनीय दृश्‍य महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी दिली.