पुणे : देशभरात गोड्या पाण्यातील मासेमारीत मोठी वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये ६६.८७ लाख टनांवर असणारे मत्स्य उत्पादन आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये १३१.१३ लाख टनांवर गेले आहे. निर्यातीतही मोठी वाढ झाली आहे. पण, उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्र पिछाडीवर आहे.
केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ६६.८७ लाख टनांवर असणारे गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १३१.१३ लाख टनांवर गेले आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात पश्चिम बंगाल आघाडीवर असून, १३१.१३ लाख टनांपैकी एकट्या आंध्र प्रदेशात ४५.०६ लाख टन मत्स्य उत्पादन होते. त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये १८.५६ लाख टन, उत्तर प्रदेशात ९.१५ लाख टन, बिहार ८.४६ लाख टन, ओडिशा ८.३९ लाख टन, छत्तीसगड ६.५२ लाख टन उत्पादन झाले आहे.
हेही वाचा >>> पुणेकर गारठले; राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद
आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२२-२३ या काळात केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना राबविण्यात आली, त्यासाठी केंद्र सरकारने ४८१० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या योजनेचा परिणाम म्हणून उत्पादनात वाढ होऊन २०२२-२३ मध्ये ६३,९६९.१४ कोटी रुपयांच्या मत्स्य उत्पादनांची निर्यात झाली आहे. सन २०१९-२० मध्ये ४६,६६२.८५ कोटी रुपयांच्या मत्स्य उत्पादनांची निर्यात झाली होती.
राज्यात उत्पादन कमी
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. महाराष्ट्रात केवळ १.४४ लाख टनांचे मत्स्योत्पादन झाले आहे. मागील आर्थिक वर्षांत म्हणजे २०२१-२२मध्ये १.५७ लाख टनांचे मत्स्योत्पादन झाले होते. सन २०१५-१६मध्ये दोन लाख टन मत्स्योत्पादन झाले होते. मात्र, त्यानंतर अपेक्षित वाढ झाल्याचे दिसून येत नाही.
राज्य पिछाडीवर, उपाययोजना सुरू
महाराष्ट्र गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात पिछाडीवर आहे. पण, गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ होण्यासाठी मत्स्य पिंजरे दिले जात आहेत. शेततळ्यांमध्ये मत्स्योत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. धरणे, बंधाऱ्यांमध्ये मत्स्यपालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथील मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी दिली.