Pune ,Pimpri Crime News पिंपरी : हॉटेलमध्ये मद्याचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून चार जणांनी मित्राचा खून केला. ही घटना तळवडे येथे घडली. गणेश लक्ष्मण पोखरकर (३४, विठ्ठलवाडी देहुगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई संतोष बांबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद विश्वनाथ मोरे (४५, विठ्ठलवाडी देहुगाव), गोरख विष्णू कुटे (४५, दत्तवाडी आकुर्डी), संतोष आनंद मराठे (३९, आकुर्डी) या तिघांना अटक केली आहे. तर त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि आरोपी हे मित्र आहेत. ते तळवडे येथील एका हॉटेलमध्ये मद्यपान करित होते. हॉटेलचे बिल देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात आरोपी विनोदने हॉटेलमधील लाकडी दांडक्याने गणेश याच्या पाठीवर, पोटावर आणि छातीवर मारहाण करून त्याला जखमी केले. त्यानंतर गणेश आरोपीवर धावून गेल्यावर, इतर आरोपींनी संगनमत करून त्याला लाकडी दांडक्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारले. देहूरोड पोलीस तपास करित आहेत.
मोशीत मद्य आणण्यावरुन मित्रावर चाकूहल्ला
मद्य विकत आणण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून एकाने आपल्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याची घटना मोशीत घडली.
तुकाराम संदीप साळवे (३३) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संदीप बाबुराव साळवे (६२, बोराटेवस्ती, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. त्यानुसार गणेश चंद्रकांत बोराटे (४०, बोराटेवस्ती, मोशी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा तुकाराम आणि त्याचे मित्र आरोपी गप्पा मारत बसले होते. मद्य विकत आणण्याच्या कारणावरून आरोपी आणि तुकाराम यांच्यात भांडण झाले. यावेळी आरोपीने तुकारामला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आरोपींनी चाकूने तुकाराम याच्या गळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
चाकणमध्ये लष्करी अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक
भारतीय लष्करातील जवान असल्याचे भासवून एकाची ७९ हजार ९९७ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना चाकण येथे घडली.
या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. खोली भाड्याने हवी असून तीन महिन्यांचे भाडे एकाच वेळी पाठवतो असे सांगून फिर्यादीला युपीआय आयडीवरून सुरुवातीला काही रक्कम पाठवण्यास सांगितले. अशाप्रकारे आरोपीने फिर्यादीकडून एकूण ७९ हजार ९९७ रुपये गुगल पे च्या माध्यमातून घेऊन फसवणूक केली. चाकण पोलीस पुढील तपास करित आहेत.
तडीपार गुंडासह तिघांना अटक
पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी शस्त्र बाळगताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्यासह वेगवेगळ्या कारवायांमध्ये तिघांना अटक करून त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.
म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेदांत मच्छिंद्र मेदगे (१९, अवधर, खेड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२० ऑगस्ट) भामचंद्र डोंगराजवळ करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई संतोष वायकर यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरगाव येथे एका तरुणाला गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी बुधवारी (२० ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले आहे. सचिन रमेश बंदीछोडे (२४, म्हाळसकरवाडी, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाच मधील पोलीस शिपाई प्रशांत पवार यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंड आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत (२३, चिंचवड) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सप्टेंबर २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधीत संपण्यापूर्वी आकाश शहरात आला. त्याने स्वतःकडे पिस्तूल बाळगले. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले आहे.