पुणे : घरकामाची जबाबदारी सांभाळतानाच शेतीमध्येही निमूटपणे काम करणाऱ्या गृहिणी या आत्मविश्वास जागृत झाल्यानंतर उद्योगिनी झाल्या. इतकेच नव्हे, तर ग्रामविकासामध्येही योगदान देऊ लागल्या. घरातील छोट्या खर्चासाठीही दुसऱ्यांवर अवलंबून असलेल्या पुरंदर तालुक्यातील हिवरेगावातील महिलांचे ‘स्वयंसिद्धा’मध्ये परिवर्तन झाले. ही किमया घडवून आणली ती ‘मॅजिक बस इंडिया फाउंडेशन’ने.
फाउंडेशनने सुरू केलेल्या ‘यंग वीमेन फेलोशिप प्रोग्राम’मुळे स्वावलंबी झालेल्या ग्रामीण भागातील महिला बदल घडविण्यामध्ये योगदान देत आहेत. महत्त्वाची जीवनकौशल्ये, नेतृत्वक्षमता आणि उद्योजकीय कौशल्याचे प्रशिक्षण महिलांना दिले जाते. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १२४ महिला उद्योजक घडल्या आहेत. हिवरे गावातील १७ महिलांनी आपापल्या हिमतीवर लघुउद्योग सुरू केले असून मोठी झेप घेण्याची त्यांची जिद्द आहे.
शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या आणि आर्थिक अडचणींमुळे अकरावीनंतर शिक्षण सोडावे लागलेल्या वर्षा मेमाणे यांनी पतीच्या पाठिंब्याने बारावी पूर्ण केली. ‘गावामध्ये भाजीपाला विक्रीची गरज ओळखून मी फेब्रुवारीमध्ये व्हेजिटेबल्स केंद्र सुरू केले. बँकेकडून मिळालेले कर्ज आणि स्वत:ची बचत याद्वारे शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला खरेदी करून पुण्यामध्येही त्याची विक्री केली. दरमहा तीन हजार रुपये नफा कमावत असून, हा व्यवसाय वाढविण्याची उमेद बाळगून आहे,’ असे वर्षा यांनी सांगितले.
पतीकडून जागा मिळवून सुरू केलेल्या कुक्कुटपालन व्यवसायातून दरमहा सात हजार रुपयांचा नफा मिळविणाऱ्या पारगाव येथील गीता मेमाणे यांनी महिलांचे संघटन करून गावात पथदिवे लावण्याचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. ‘हा व्यवसाय वाढविण्याची इच्छा जरूर आहे. पण, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन द्यावी लागेल का, याचे उत्तर मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे,’ असे गीता मेमाणे यांनी सांगितले.
फर्निचरसाठी चाकनिर्मितीचा व्यवसाय करण्यासाठी सहा लाखांचे कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या तृप्ती यांनी त्यांच्या शेताजवळील जागेमध्ये पारस एण्टरप्रायझेस नावाचा छोटा व्यवसाय सुरू केला. शेतामध्ये वाटाणा लावला आहे. ‘फाउंडेशन’च्या प्रशिक्षणातून संभाषण, समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य तर मिळालेच; पण, माझ्यामध्ये आत्मविश्वास आला. आता मी दरमहा १५ हजार रुपये कमावत असून, आर्थिक बाबींसाठी पतीवर अवलंबून नाही’, असे तृप्ती जगताप यांनी सांगितले.
भरतकामात पारंगत असलेल्या निशा चावीर या युवतीने बी.ए.चा अभ्यास करतानाच स्वत:चा व्यवसाय सुरू केला. ‘निशा फॅशन’च्या माध्यमातून गावातील बारा महिलांना या कलेत प्रावीण्य मिळवून देण्याबरोबरच मी दरमहा दहा हजार रुपये नफा कमावते, असे निशाने सांगितले. तर, एकत्र कुटुंबातील रेश्मा परदेशी यांनी घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन ब्युटी पार्लर सुरू केले आहे.
ग्रामविकासामध्ये महिलांचे योगदान
– गळत असलेली गावातील पाण्याची टाकी पाडून टाकून त्या जागी नवी टाकी बांधण्यास ग्रामपंचायतीला भाग पाडले.
– रस्त्यांवर दिवे लावण्यास प्रवृत्त करून गावातील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले.
– हिवरे गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लावला.
– महिलांना कौशल्य विकसनासाठी ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या निधीतून व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास भाग पाडले.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशनने सुरू केलेल्या ‘यंग विमेन फेलोशिप प्रोग्राम’मुळे स्वावलंबी झालेल्या ग्रामीण भागातील महिला बदल घडविण्यामध्ये योगदान देत आहेत. फक्त आर्थिक स्वावलंबनच नाही, तर ग्रामीण भागात सामुदायिक बदल, नेतृत्व करत त्यांनी आशेचा किरण दाखवला आहे. – प्रवीणा कुकडे, उपसरव्यवस्थापक, मॅजिक बस इंडिया फाउंडेशन