पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून, प्रवेश प्रक्रिया स्थगित न झाल्यास आंदोलन करू,’ असा इशाराही दिला आहे. अभ्यासक्रमांच्या प्रवेशात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

‘एफटीआयआय’ विद्यार्थी संघटनेच्या वतीने विकुल शुक्ला, अनुश्रीता चक्रवर्ती, अजमल शाह, अजयराज पी., सौम्यदीप मंडल यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली.

‘‘एफटीआयआय’ने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाले होते. ही बाब विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणल्यानंतर प्रशासनाने यादीत ‘लिपिकीय त्रुटी’ असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) प्रवेशासाठीची सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या सुधारित यादीतही अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ‘स्क्रीन ॲक्टिंग’ या अभ्यासक्रमातील जागा १६ वरून २३ करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी असलेल्या आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले असून, अनुसूचित जाती आणि जमातींसाठीच्या राखीव जागा कमी झाल्या आहेत,’ असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

‘प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या प्रवेश पातळीसाठीचे आवश्यक गुण, श्रेणी आणि आरक्षण वर्गवारी जाहीर केली नाही. ‘सीट प्रेफरन्स’चा पर्याय नंतर देण्याऐवजी सुरुवातीलाच निवडण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, ‘एफटीआयआय’च्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,’ असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘एफटीआय’ प्रशासनाने सोमवारी (२७ ऑक्टोबर) विद्यार्थ्यांना चर्चेला बोलावले असून, लवकरच भूमिका स्पष्ट करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या

  • प्रवेश प्रक्रिया तत्काळ स्थगित करा
  • दोन्ही टप्प्यांचे निकाल आणि गुण जाहीर करा
  • या प्रवेश प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी, त्यासाठी बाह्य समिती नेमण्यात यावी.
  • प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व्हावी म्हणून विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश प्रशासकीय मंडळात करावा