पुणे : राज्यातील गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केल्यानंतर शहरातील विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून गुरुवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात आरती करून पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
ऐतिहासिक परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्याबाबतची घोषणा गुरुवारी विधानसभेत केली. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा द्यावा, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी केली होती.
या घोषणेनंतर ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या परिसरात जल्लोष करण्यात आला. सुनील रासने, सूर्यकांत पाठक, सुहास कुलकर्णी, विकास पवार, महेश सूर्यवंशी, रवींद्र माळवदकर, शिरीष मोहिते, पियुष शहा, विनायक घाटे, नितीन पंडित, किरण सोनीवाल, कुणाल पवार, राकेश ढाकवे, निरंजन भगत, कमलेश भडसावळे, अनिरुद्ध येवले, सचिन पवार, अमित जाधव, अमर लांडे, विनायक कदम, साई डोंगरे, चकोर सुबंध, प्रतीक इपेते, कुणाल गरुड, मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे, उमेश चव्हाण, राजू परदेशी, निलेश कदम, सनी पवार, किरण जगदाळे, पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
एक गणेश मंडळ कार्यकर्ता विधानसभा सभागृहात गेल्यानंतर काय करू शकतो, हे हेमंत रासने यांनी दाखवून दिले. गणेशभक्तांसाठी आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे लाडक्या बाप्पाचा उत्सव आता अधिक भव्य, रंगतदार आणि उत्साहपूर्ण साजरा होणार, अशी भावना यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.