पिंपरी : मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात, जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी-चिंचवडनगरीत बुधवारी गणरायाचे स्वागत करण्यात आले. भक्तिमय वातावरणात भाविकांनी घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली; तर सार्वजनिक मंडळांनी वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली. सकाळपासून अवघे शहर गणेशमय झाले होते, तर प्रमुख रस्ते गर्दीने फुलून गेले होते.

गणेश चतुर्थीला सकाळपासूनच शहरभरात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, सांगवी, पिंपळे सौदागर, निगडीतील बाजारपेठा तसेच प्रमुख रस्त्यांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी अबालवृद्धांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. प्रारंभी घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येत होती. त्यादृष्टीने सकाळपासूनच गणेशमूर्तीसोबतच पूजेचे व घरगुती सजावटीचे साहित्य खरेदी करण्याची लगबग होती.

दुपारनंतर, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणपती आणण्यास सुरूवात केली. ढोलताशांचा गजर, फुलांनी सजवलेल्या रथात गणरायाची मिरवणूक काढली. निगडीतील जय हनुमान मित्र मंडळ, भोसरीतील फुगे माने तालिम मित्र मंडळ, कै. भगवान गव्हाणे तरुण मित्र मंडळ, लांडगे लिंबाची तालीम मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, पठारे लांडगे व्यायाम शाळा मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ, कै. दामुशेठ गव्हाणे मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ, नरवीर तानाजी मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, चिंचवडमधील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ या मंडळांनी मिरवणूक काढत गणरायाची प्रतिष्ठापना केली.

उशिरापर्यंत मंडळांच्या श्रींची प्रतिष्ठापना सुरू होती. पहिल्याच दिवसापासून देखावे सुरू करण्याचा अनेक मंडळांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्यांची धावपळ होती. पारंपरिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची उधळण करत मोठ्या थाटात गणरायाचे आगमन झाले. ढोल ताशांच्या दणदणाटाने वातावरण मंगलमय झाले होते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणराय विराजमान

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या निगडीतील घरी गणपतीचे आगमन झाले. सोनालीने पर्यावरणपूरक पद्धतीने गणपतीची मूर्ती साकारली आहे. ‘मूर्तीला घडवण्यासाठी शाडूच्या मातीचा वापर केला आहे. सजावटीसाठी मनीप्लांटच्या खरोखरच्या वेलींचा वापर केला आहे. सजावटही नैसर्गिकपणे केली आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होवो, ही गणपतीच्या चरणी प्रार्थना.’ असे सोनाली म्हणाली.