पुणे : आजारपणाने रुग्णालयात दाखल झाल्याने इच्छा असूनही गणेशोत्सवात सहभागी होता येऊ शकत नाही, अशा गणेशभक्तांना रुग्णालयामध्येच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आभासी दर्शन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यंदाच्या सजावटीमध्ये आपण उभे असून, थेट गुरुजींच्या शेजारी उभे राहून आरतीमध्ये सहभागी झाल्याचा अनुभव ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’द्वारे रुग्णांनी घेतला. रुग्णालयात असूनही गणरायाचे दर्शन घेता आल्याने अनेकांचे डोळे पाणावले.

भक्ती आणि सेवेची उदात्त परंपरा कायम राखत, ज्यांना प्रत्यक्ष उत्सवात येणे शक्य नाही अशांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ‘इमर्सिव्ह दर्शन’ ट्रस्टने उपलब्ध करून दिले. अजय पारगे आणि संजय पारगे यांनी पुढाकार घेऊन हा अभिनव उपक्रम राबविला. मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री रुग्णालयातील रुग्णांनी यानिमित्ताने दर्शनाचा आनंद घेतला.

आजारपणामुळे रुग्णालयातील खाटेवरून कुठेही जाता न येणाऱ्या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते. मात्र, केवळ मनामध्ये गणरायाचे रूप साठवावे लागते. अशा रुग्णांना ‘व्हर्च्युअल रिॲलिटी’द्वारे गणरायाच्या मूर्तीसमोर दर्शन घेत नतमस्तक होत असल्याची प्रचिती आली. लवकर बरे व्हावे, यासाठी रुग्णांनी प्रार्थना केली.

नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये सुरू झालेला हा सेवा उपक्रम, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून, अनेकांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला. गणरायाप्रती कृतज्ञता आणि परंपरेचा आदर म्हणून पारगे कुटुंबातील तिसऱ्या पिढीने ही सेवा आधुनिक मार्गाने पुढे नेली आहे. हा उपक्रम डिजिटल आर्ट व्हीआरई प्रा. लि. या कंपनीमार्फत राबवला जातो. दगडूशेठ गणपतीची आरती ३६० अंशाच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहे आणि आता ती रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देत आहे.

‘व्हर्च्युअल रिॲलिटी’द्वारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्याची संधी रुग्णांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णांना वेगळी ऊर्जा व समाधान मिळत असून, गणरायाचा हा दर्शनरूपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. उपक्रमाला रुग्णांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.– महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट