Ganeshotsav 2025 : पुणे : गणेशोत्सवात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला. स्वारगेट आणि पुणे-सातारा रस्त्यावरील शंकरमहाराज उड्डाणपूल परिसरात दोघांचे मोबाइल संच हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या.

स्वारगेट भागातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ महाविद्यालयीन तरुणाचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण शिवाजीनगर भागातील दीपबंगला चौकात एका खासगी वसतिगृहात राहायला आहे. तो शनिवारी (३० ऑगस्ट) सकाळी सव्वादहाच्या सुमारास लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातून निघाला होता. त्या वेळी चोरट्यांनी त्याच्यकडील २५ हजारांचा मोबाइल संच हिसकावून नेला. तरुणाने आरडाओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एका महिलेच्या हातातील ४० हजारांचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहेत. त्या शनिवारी रात्री दहाच्या सुमारास शंकर महाराज उड्डाणपूल परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या हातातील महागडा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस हवालदार अमोल पवार तपास करत आहेत.