पुणे : आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याच्या संशयावरुन गुंड टिपू पठाण टोळीतील सराइतांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने सोमवार पेठ परिसरातून अटक केली. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यासह आठ जणांविरुद्ध मंगळवारी (२ सप्टेंबर) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आंदेकर टोळीला पिस्तुले पुरविल्याच्या संशयावरुन पोलिसांनी सोमवार पेठ परिसरातून तालीम आस मोहंमद खान उर्फ आरिफ (वय. २४, रा. लोणी काळभोर) युनूस जलील खान (वय २४, रा. सय्यदनगर, हडपसर) यांना अटक करण्यात आली. दोघे टिपू पठाण टोळीतील सराइत आहेत. तालीम याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो मध्यप्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले आणून शहरातील सराइतांना विक्री करतो. तालीम याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतूसे पोलिसांनी जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत पोलीस हवालदार अनिकेत बाबर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर, नीलेश जाधव, ओंकार कुभार, संभाजी सकटे, नीलेश साबळे, अमित जमदाडे यांनी ही कामगिरी केली. वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि साथीदारांची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत. त्यांच्या घराची पाहणी करून गायकवाड याच्या निकटवर्तीयांचा खून करण्याचा कट आंदेकर टोळीने रचला होता.
आंदेकर टोळीतील अमन पठाण याच्यासोबत तालीम खान याचे मोबाइलवरुन संभाषण झाले असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. आंदेकर टोळीतील सराइत दत्ता काळे हा कृष्णा आंदेकर याच्या संपर्कात होता. आंदेकर याने काळे याला पाच हजार रुपये खोली भाड्याने घेण्यासाठी दिले होते. काळे याने कृष्णाला वनराज आंदेकर याच्या खून करणाऱ्या आरोपींच्या घराची माहिती दिली होती.