‘एनसीएल’च्या मदतीने महापालिकेचा उपक्रम

घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेने ‘शास्त्रीय’ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायामुळे पर्यावरणपूरक पद्धतीने घरच्या घरी गणेश मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे. या पद्धतीत शाडू तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्ती ४८ तासांमध्ये अमोनियम बायकाबरेनेटच्या मदतीने विरघळविण्यात येणार असून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज्) मदतीने हा उपक्रम राबवणार आहे. यंदा मोठय़ा प्रमाणावर या उपक्रमाची सुरुवात महापालिकेकडून होणार आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून यंदा हे रसायन मोफत उपलब्ध करून दिले जाईल.

गणेशोत्सवाच्या कालावधीत घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेकडून कृत्रिम हौद बांधण्याची संकल्पना सन १९९८ रोजी पुढे आली. नदीतील प्रदूषित पाण्यामुळे नदीमध्ये मूर्तीचे विसर्जन करण्यास बहुसंख्य नागरिकांनी दाखविलेली अनुत्सुकता हे त्यामागील प्रमुख कारण होते. कृत्रिम पद्धतीने हौदांची बांधणी केल्यानंतर प्रारंभी त्याला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यानंतर झालेल्या जनजागृतीमुळे सन २००५ पासून हौदात गणेशमूर्ती विसर्जनाच्या संकल्पनेस गती मिळाली. सध्या महापालिकेकडून ५० कृत्रिम हौदांची बांधणी करण्यात येते. त्यात किमान एक लाख गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. मुळा-मुठा नदीकाठच्या काही भागांबरोबरच शाळा आणि काही मोठय़ा गृहप्रकल्पांमध्ये प्रशासनाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. मात्र हौदात विसर्जन केलेल्या मूर्ती विरघळत नसल्यामुळे या विसर्जन केलेल्या मूर्तीचे काय करायचे असा प्रश्न प्रशासनाला भेडसावत होता. त्यामुळेच शास्त्रीय पद्धतीने रसायनाचा वापर करून गणेश मूर्तीचे विर्सजन करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी गतवर्षी प्रशासनाकडून करण्यात आली होती.

अमोनियम बायकोबरेनेटच्या मदतीने गणेश मूर्ती दोन दिवसांत विरघळविणे शक्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून गतवर्षी छोटय़ा प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात आला होता. यंदा मोठय़ा प्रमाणात या पद्धतीचा वापर करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होऊन हौद, कॅनॉल आणि नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन करण्याचे प्रमाणही काही अंशी कमी होईल, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे. घरच्या घरी बादलीमध्ये मूर्तीचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांसाठी १० टन अमोनियम बायकाबरेनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत प्लॅस्टर ऑफ पॅरिससह शाडूच्या मूर्ती ४८ तासांत विरघळतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महापालिकेकडील आकडेवारीनुसार घरगुती मूर्तीची संख्या ३ लाखांच्या आसपास असून त्यासाठी किमान २ हजार टन अमोनियम बायकाबरेनेटची आवश्यकता भासणार आहे.

क्षेत्रीय स्तरावर कार्यालयांना ठराविक स्वरूपात हे रसायन उपलब्ध करून देण्यात येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ते नागरिकांना विनामूल्य देण्यात येईल, अशी माहिती सह महापालिका आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली. एक किलो वजनाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी तितकेच अमोनियम बायकाबरेनेट आणि पाच लिटर पाण्याची आवश्यकता असून विरघळलेल्या मूर्तीचा खत म्हणून वापर करता येणे शक्य आहे.