पुणे : कोथरूड कचरा डेपो येथील कचरा रॅम्प १५ मेपासून बंद करण्यात आल्यानंतर कोथरूड आणि वारजे भागात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मेट्रोला डेपो तयार करण्यासाठी दिलेली कचरा रॅम्पची जागा चार महिन्यांसाठी पुन्हा महापालिकेकडे देण्याबाबतचे पत्र महापालिकेने महामेट्रोला दिले आहे. या मागणीला महामेट्रोने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने महापालिकेकडून लवकरच या कचरा रॅम्पवर कचरा विलगीकरण आणि हस्तांतराचे काम केले जाणार आहे.

गेल्या महिन्यात कोथरूड येथील कचरा डेपोमधील कचरा संकलनाची जागा महापालिकेने मेट्रोला डेपोच्या विकसनासाठी दिली आहे. मात्र, ही जागा दिल्यानंतर या भागातील कचरा गोळा करण्याच्या कामावर परिणाम झाला. त्यामुळे ही जागा चार महिन्यांसाठी परत देण्यासाठी मेट्रो प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

कोथरूड येथे असलेला कचरा डेपो काही वर्षांपूर्वी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे हलविण्यात आला. वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्प तयार करताना कचरा डेपोची जागा महापालिकेने महामेट्रोला डेपो तयार करण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोथरूड कचरा डेपो बंद झाल्यानंतर महापालिकेने येथील ३० गुंठे जागेवर कचरा हस्तांतर रॅम्प तसाच ठेवला होता. येथे वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गोळा होणारा ओला आणि सुका कचरा संकलित करण्यात येत होता. गेल्या महिन्यात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घनकचरा विभागाला कोथरूडचा कचरा रॅम्प तातडीने बंद करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १५ मेपासून हा कचरा रॅम्प बंद करण्यात आला. येथील कचरा महापालिकेच्या घोले रस्ता आणि कात्रज येथील रॅम्पवर पाठविण्यात येतो.

‘गेल्या दोन आठवड्यांपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने शेतामध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे कचरा रॅम्पवरून खत बनविण्यासाठी शेतकऱ्यांनी महापालिकेचा कचरा घेणे थांबविले होते. या प्रकारामुळे कोथरूड, वारजे परिसरात कचऱ्याचे ढीग लागले. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या घनकचरा विभागाने महामेट्रो प्रशासनाला पत्र देऊन कोथरूड येथील कचरा रॅम्पची जागा पुढील चार महिने वापरण्यास मिळावी, अशी विनंती केली आहे. या विनंतीला मेट्रोने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच कोथरूड येथील कचरा रॅम्पवर कचरा विलगीकरण व हस्तांतर करण्याचे काम पुन्हा सुरू होईल,’ असे संदीप कदम यांनी सांगितले.

बावधनला रॅम्प बांधण्यात अडचण

‘महापालिकेने रॅम्प हटवून ही जागा मेट्रोला डेपो विकसित करण्यासाठी द्यावी, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोचा पाठपुरावा सुरू होता. कोथरूड येथील कचरा रॅम्पची पर्यायी व्यवस्था म्हणून बावधन येथील ४० गुंठे जागेत महापालिकेने रॅम्प विकसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ही जागा एनडीए विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येते. त्यामुळे कचरा रॅम्पचे शेड बांधण्यासाठी संरक्षण विभागाची (डिफेन्स) परवानगी बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेने अर्जही केला आहे. मात्र, परवानगी मिळाल्याशिवाय येथे बांधकाम करता येणार नाही,’ असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न आहे. धायरी, हडपसर येथील कचरा प्रकल्प देखभाल-दुरुस्तीसाठी बंद ठेवले होते. त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ते सुरू करण्यात येतील. – संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, पुणे महापालिका