scorecardresearch

‘गीतरामायणा’तून साधणार तीन पिढय़ांचा संगम

गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या गीतरामायण सादरीकरणातून तीन पिढय़ांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

‘गीतरामायणा’तून साधणार तीन पिढय़ांचा संगम

आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायण’ या अजरामर कलाकृतीचा हीरकमहोत्सव गदिमा प्रतिष्ठानतर्फे साजरा होत आहे. २० एप्रिल १९५६ रोजी मूळ गीतरामायणाच्या सांगतेचे गीत आकाशवाणीवरून सादर झाले होते. आता साठ वर्षांनी गुढी पाडव्याचे औचित्य साधून २० एप्रिल रोजी चार दिवसांच्या ‘गीतरामायण’ सादरीकरणाची गुढी उभारण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या गीतरामायण सादरीकरणातून तीन पिढय़ांचा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.
मराठी माणसाच्या गीतरामायणावरील प्रेमाचे प्रतीक म्हणून २० एप्रिल रोजी मान्यवराच्या हस्ते एका गीतरामायण ज्योतीचे प्रज्वलन करण्यात येणार असून सांगतेला ही ज्योत समारंभपूर्वक नव्या पिढीच्या हवाली सुपूर्द केली जाणार आहे. दररोज पहिल्या भागात विविध भाषेतील गीतरामायणाचे सादरीकरण, गीतरामायणाचे शब्द आणि सूर याचे सौंदर्य उलगडून दाखविणारे मान्यवर वक्त्यांचे व्याख्यान आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केलेला गीतरामायणाविषयीचा आदरभाव असेल. काही परदेशी वंशाच्या गायक-गायिकांनी मराठी, इंग्रजी, जर्मन भाषेतील गीतरामायणाचे सादरीकरण, बृहन महाराष्ट्रातील कलाकारांनी नृत्यासह सादर केलेल्या हिंदी गीतरामायणातील काही गीतांचा अंश रसिकांना अनुभवता येणार आहे.
उत्तरार्धात रवींद्र साठे, उपेंद्र भट, प्रमोद रानडे, हृषिकेश रानडे, विभावरी जोशी, मधुरा दातार यांच्याबरोबरच हृषिकेश बडवे, राजेश दातार, प्राजक्ता रानडे, मीनल पोंक्षे, संपदा जोशी, श्रेया माडगूळकर-सरपोतदार, हेमंत वाळुंजकर हे नव्या दमाचे कलाकार दररोज गीतरामायणातील १४ गीते सादर करणार आहेत. आनंद गोडसे आणि पराग माटेगावकर संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. काही गीतांवर नृत्ये सादर केली जाणार असून निकिता मोघे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. गीतरामायणातील काही गीतांचे गायन आणि निरुपण आनंद माडगूळकर करणार असून ‘गीतरामायण : बाबुजी आणि गदिमा’ या विषयावर श्रीधर फडके यांची मुलाखत होणार आहे. सांगतेला आठ ते दहा वर्षे वयोगटातील विद्यार्थी काही गीतांचे सादरीकरण करणार असून त्यांच्याच हाती गीतरामायण ज्योत सुपूर्द केली जाणार आहे.
गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवानिमित्त प्रतिष्ठानतर्फे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. प्रा. मिलिंद जोशी हे संपादक असलेल्या स्मरणिकेमध्ये दुर्मिळ छायाचित्रे, लेख, व्यंगचित्रांचा समावेश आहे. गदिमा प्रतिष्ठान आणि स्वरानंद प्रतिष्ठान यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या गीतरामायण गायन स्पर्धेतील अमिता घुगरी, शंतनू पानसे आणि स्वामिनी कुलकर्णी या विजेत्यांचा महोत्सवात सन्मान करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2015 at 03:20 IST

संबंधित बातम्या