न्यायालयात शिक्षेवर म्हणणे मांडत असताना जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी मिर्झा हिमायत बेगला गुरुवारी न्यायालयात रडू कोसळले. हुंदके देत त्याने आपण निरापराध असल्याचे सांगितले. आपला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असून, कधीतरी सत्य काय ते समोर येईल आणि मला न्याय मिळेल. न्यायालयाने सर्व गोष्टीचा विचार करून दया दाखवावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली.
गेल्या सोमवारी बेगला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोषी धरले होते. त्याला शिक्षेवर आपले म्हणणे मांडण्यास वेळ दिला होता. गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्यासमोर खटल्याच्या कामकाजाला सुरूवात झाली. न्यायालयाने बेगला शिक्षेवर तुला काय बोलायचे आहे, असे विचारल्यानंतर त्याने सांगितले, ‘मी खोटे बोलणार नाही. माणसे मारून काय फायदा मिळणार आहे. २००६च्या गुन्ह्य़ात माझ्यावर पळून गेल्याचा आरोप होता. मात्र, त्यावेळी कुठेही पळून गेलेलो नव्हतो. निरापराध मुलांना पकडले जात होते. मलाही पोलीस पकडतील या भीतीनेच घरात लपून बसलो होतो. बेकरीमध्ये निष्पाप बळी पडलेल्यांच्या खुनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माझा सहभाग नाही. मला भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आदर आहे. शंभर अपराधी सुटले तरी चालेल, पण एका निरापराधाला शिक्षा होणार नाही. हे न्यायव्यवस्थेचे तत्व आहे. बेकरीत मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय देताना दुसऱ्या निरापराधाला शिक्षा देऊन न्याय होऊ शकत नाही’, असे सांगत असताना बेगला रडू कोसळले. थोडे थांबून बेगने हुंदके देत पुन्हा आपले म्हणणे न्यायालयास सांगण्यास सुरूवात केली.