घुमान येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये सहभाग म्हणजे ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ अशी प्रकाशकांची भावना झाली आहे. मात्र, तरीही मराठीच्या प्रेमापोटी व्यवसायाची गणिते बाजूला ठेवत प्रसंगी पदरमोड करून घुमानला जाण्याची तयारी काही प्रकाशकांकडून केली जात आहे. ग्रंथविक्रीला प्रतिसाद कसा मिळेल याविषयी कोणतीच जाणीव नसल्याने पुण्यातील प्रकाशक काही मध्यममार्ग निघेल या अपेक्षेमध्ये आहेत.
संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या पंजाबातील घुमान येथे आगामी साहित्य संमेलन भरविण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नुकताच घेतला आहे. घुमानमध्ये मराठी भाषा आणि संस्कृती रुजलेली नाही. त्यामुळे आसपासच्या ठिकाणांहून संमेलनाला किती मराठी बांधव उपस्थित राहतील याविषयी साशंकता आहे. शिवाय हे अंतर दूरचे असल्याने तेथे पुस्तके घेऊन जाणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. त्यामुळे या संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये सहभाग घ्यावा का याविषयी मराठी प्रकाशकांमध्ये संभ्रम आहे. एक तर एवढय़ा दूरवर पुस्तके न्यायची कशी हा प्रश्न असून तेथे किती प्रतिसाद मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. वाचकांनी पुस्तके खरेदी करावीत यासाठी सवलतदेखील द्यावी लागते. हे सारे ध्यानात घेता एवढा खर्च झेपणे शक्य आहे का याचाही विचार करावा लागेल. त्यामुळे नुकसान सोसण्यापेक्षा संमेलनामध्ये सहभाग न घेणे हेच हितावह ठरणार असल्याची भूमिका मराठी प्रकाशक परिषदेने घेतली आहे.
संमेलनात सहभागी होण्याविषयी प्रकाशकांच्या अडचणी काय आहेत याची चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक होणार आहे. संमेलनात कोणत्या पुस्तकांची विक्री होऊ शकते यासंबंधी प्रकाशकांनी एकत्र येऊन सहभाग घेणे योग्य ठरेल. साहित्य महामंडळ आणि संयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाशकांशी चर्चा करून मध्यममार्ग काढला तरच योग्य ठरेल, अशी अपेक्षा कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी व्यक्त केली. तेथे विक्री होणार नाही हे उघडच आहे. पण, पंजाबी-मराठी साहित्याची देवाणघेवाण करण्याच्यादृष्टीने संमेलनाचा उपयोग होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोश वाङ्मय प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या डायमंड पब्लिकेशन्सचे दत्तात्रेय पाष्टे यांनी संमेलनातील सहभागाविषयी अद्याप निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले. मात्र, अजून सहा महिन्यांचा अवधी असल्याने काही तरी मार्ग निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
केवळ ग्रंथप्रदर्शनातील व्यवसायापेक्षाही पंजाबी साहित्यातील उत्तम कलाकृती मराठीमध्ये आणण्याच्या दृष्टीने संधी म्हणून या संमेलनाकडे पाहात असल्याचे मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी सांगितले. पंजाबी बुकसेलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी आपली चर्चा सुरू झाली असून लवकरच त्याची फळे दिसू लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संमेलन महाराष्ट्रातच व्हावे
साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हावे ही राजहंस प्रकाशनची भूमिका असल्याचे संचालक-संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी सांगितले. अपवाद म्हणून जेथे मराठी माणसांचे प्राबल्य आहे आणि मराठी संस्कृती रुजलेली आहे अशा इंदूर, बडोदा आणि बेळगाव येथे यापूर्वी संमेलने झालेली आहेत. मात्र, थेट मराठी लोकांचा काहीही संबंध नाही अशा ठिकाणी संमेलन घेण्यात औचित्य दिसत नाही. सांस्कृतिकदृष्टय़ा कसा प्रतिसाद मिळेल हे अधांतरी आहे. व्यावसायिकदृष्टय़ा भरीव विक्री होणार नाही. त्यामुळे संमेलनपूर्व संमेलन अंतर्गत राज्यात चार-पाच ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम आणि ग्रंथप्रदर्शने भरवावीत, अशी सूचना बोरसे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghuman punjab marathi sahitya sammelan publisher think response sale
First published on: 18-07-2014 at 03:00 IST