scorecardresearch

आले, मिरची, ढोबळी मिरची, पावटा, मटार महाग; टोमॅटो, शेवग्यासह ‘या’ भाज्यांच्या दरात घट

आवक वाढल्याने टोमॅटो, शेवगा, घेवडा, तोतापुरी कैरीच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Ginger Chilli expensive
आले, मिरची, ढोबळी मिरची, पावटा, मटार महाग; टोमॅटो, शेवग्यासह 'या' भाज्यांच्या दरात घट

पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. मागणी वाढल्याने आले, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, पावटा, मटार या फळभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. आवक वाढल्याने टोमॅटो, शेवगा, घेवडा, तोतापुरी कैरीच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२ एप्रिल) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून २ टेम्पो गाजर, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूतून ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, मध्यप्रदेशातून १ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून मिळून तोतापुरी कैरी ७ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ३० ते ३५ ट्रक बटाटा आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख आडते विलास भुजबळ यांनी दिली. पुणे विभागातून सातारी आले एक हजार ते ११०० गोणी, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, फ्लाॅवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पाे, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो , कांदा १४० ट्रक अशी आवक झाली.

हेही वाचा – येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटातील हाणामारीत दोन कैदी जखमी; सहा कैद्यांविरुद्ध गुन्हा

कोथिंबिर, मेथीवगळत अन्य पालेभाज्या स्वस्त

मार्केट यार्डातील तरकारी विभागात मागणी वाढल्याने कोथिंबिर, मेथीच्या जुडीच्या दरात २ ते ३ रुपयांनी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. किरकोळ बाजारात सर्व पालेभाज्यांच्या जुडीचे दर १० ते २५ रुपयांपर्यंत आहेत. तरकारी विभागात कोथिंबिरच्या दीड लाख जुडींची आवक झाली. तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – तीन वर्षांचा कालावधी महापालिकेत पूर्ण करण्यास मिळाल्यास आनंद होईल – पिंपरी महापालिका आयुक्त शेखर सिंह

डाळिंब, चिकूच्या दरात घट

मुस्लीमधर्मीयांकडून रमजान महिन्यात उपवास केले जातात. रमजान महिन्यामुळे रसाळ फळांना मागणी आहे. फळ बाजारात डाळिंब आणि चिकूच्या दरात घट झाली असून खरबूज, पपई, संत्री, माेसंबी, पेरूचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळमधून ६ ट्रक अननस, संत्री ३० ते ४० टन, मोसंबी २५ ते ३० टन, डाळिंब २५ ते ३० टन, पपई ५ ते ६ टेम्पो, लिंबे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड १५ ते २० ट्रक, खरबूज २० ते ३० ट्रक, पेरू ५०० ते ७०० प्लॅस्टिक जाळी (क्रेट्स), चिकू दोन हजार डाग, हापूस आंबा ४ ते ५ हजार पेटी, पपई ५ ते ६ टेम्पो अशी आवक झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 18:12 IST

संबंधित बातम्या