scorecardresearch

येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटातील हाणामारीत दोन कैदी जखमी; सहा कैद्यांविरुद्ध गुन्हा

येरवडा कारागृहातील कैद्यांच्या दोन गटात वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली.

Two inmates injured Yerawada Jail
येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटातील हाणामारीत दोन कैदी जखमी; सहा कैद्यांविरुद्ध गुन्हा (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : येरवडा कारागृहातील कैद्यांच्या दोन गटात वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत दोन कैदी जखमी झाले असून, त्यांच्यावर कारागृहातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीराम गणेश पांचाळ (वय २८), मुसा अबू शेख (वय ३२) अशी जखमी झालेल्या कैद्यांची नावे आहेत. याबाबत कारागृहातील रक्षक एकनाथ गांधले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अर्जुन बाजीराव वाघमोडे, ओंकार नारायण गाडेकर, रोहन रामोजी शिंदे, साहील लक्ष्मण म्हेत्रे, ऋषिकेश हनुमंत गडकर, मंगेश शकील सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे : बेकायदा सावकाराविरुद्ध गुन्हा; महिलेला धमकावून अडीच लाख रुपये उकळले

हेही वाचा – तीन वर्षांचा कालावधी महापालिकेत पूर्ण करण्यास मिळाल्यास आनंद होईल – पिंपरी महापालिका आयुक्त शेखर सिंह

आरोपी न्यायाधीन बंदी (कच्चे कैदी) आहेत. आळंदी येथे दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात अर्जुन वाघमोडे, ओंकार गाडेकर यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहातील कैदी हरीराम पांचाळ, मुसा शेख यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. वादातून गाडेकर, वाघमोडे आणि साथीदारांनी बराक क्रमांक दोन परिसरात हौदाजवळ प्लास्टिकची बादली, भाजी वाढण्याचे वरगळ्याने पांचाळ आणि शेख यांना मारहाण केली. मारहाणीत शेख आणि पांचाळ यांना दुखापत झाली. कारागृह रक्षकांनी गाडेकर, वाघमोडे आणि साथीदारांना ताब्यात घेतले. येरवडा पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 17:31 IST

संबंधित बातम्या