पुणे : कृत्रिम प्रज्ञा क्षेत्र हे सामर्थ्यवान सरकार आणि तितकेच सामर्थ्यवान उद्योगपती यांच्या हाती गेले तर ते लोकशाहीच्या मुळावर उठेल. असे होणे टाळण्यासाठी सध्याच्या पत्रकारितेने आपली राजकारण-मग्नता सोडून आपल्यासमोरील पर्यावरण आणि कृत्रिम प्रज्ञा विकासाच्या गंभीर आव्हानांची दखल घ्यायला हवी, असे स्पष्ट प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्याना’त केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी), पाडगावकर कुटुंबीय आणि सिम्बायोसीसच्या वतीने आयोजित ‘कंटेम्पररी न्यूज मीडिया अ‍ॅट क्रॉसरोड्स’ या विषयावरील व्याख्यानात कुबेर बोलत होते. याआधी शेखर गुप्ता, करण थापर, पी साईनाथ, राजदीप सरदेसाई, ‘बीबीसी’च्या योगिता लिमये यांनी ही वार्षिक व्याख्यानपुष्पे गुंफलेली आहेत. सिम्बायोसीसच्या मुख्य सभागृहात सोमवारी झालेल्या व्याख्यानास पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसीस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्यापीठाच्या विद्या येरवाडकर, ‘पीआयसी’चे प्रमुख अभय वैद्य हे मंचावर होते तर उपस्थितांत विजय केळकर, अनु आगा, सई परांजपे, लतिका पाडगावकर, आदींसह पुण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा समावेश होता. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांची व्याख्यानातील उपस्थिती लक्षणीय होती. नंतरच्या प्रश्नोत्तराच्या सत्रातही विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले. या वेळी पाडगावकर यांच्या आठवणींना अनेक मान्यवरांनी उजाळा दिला.

हेही वाचा >>>राज्य मागासवर्ग आयोगाची शुक्रवारी पुण्यात बैठक

सध्या हवामान बदल आणि कृत्रिम प्रज्ञा ही आपल्यासमोरील अत्यंत मोठी आव्हाने आहेत. पर्यावरणीय आव्हान हे तर कोविडपेक्षा किती तरी अधिक गंभीर आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी माध्यमांनी त्याकडे गंभीरपणे पाहायला हवे. ही आव्हाने समजून घेऊन त्याबद्दल समाजाला जागरूक करायला हवे, अशी अपेक्षा कुबेर यांनी व्यक्त केली.

कृत्रिम प्रज्ञेमुळे केवळ रोजगार जातील एवढीच भीती नाही, तर सरकार आणि बडय़ा कंपन्या त्याचे व्यवस्थापन करू लागल्यास फार मोठा धोका आहे. त्यामुळे प्रत्येक पावलावर प्रश्न विचारण्याची जागरूकता पत्रकारांनी दाखवायला हवी, असे कुबेर यांनी नमूद केले. ‘पत्रकारिता ही मनोरंजन करण्यासाठी नाही. आपण व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आणि स्थितिशीलतेला आव्हान देण्यासाठी आहोत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाला पक्षनिरपेक्ष भावनेतून प्रश्न विचारणे हे माध्यमांचे आद्यकर्तव्य आहे’, असे कुबेर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बातमीदाराची भूमिका काय?

सध्या बातम्या ‘ऑटो पायलट’ मोडवर आहेत, त्यामुळे बातमीदाराची गरजच काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बातमी ‘फाइव्ह डब्ल्यू’ (व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय, व्हू) आणि ‘वन एच’ (हाऊ) सूत्राच्या आधारे लिहिली जाते, परंतु कालसुसंगत राहण्यासाठी बातमीदाराला त्याच्या बातम्यांमध्ये आणखी दोन ‘डब्ल्यू’ जोडणे आवश्यक आहे. ‘व्हाय नाऊ’ आणि ‘व्हाट नेक्स्ट’ (आताच का? आणि पुढे काय?) हे दोन प्रश्न बातमीदाराचे काम अधिक समर्पक बनवतील आणि पत्रकारांस कालबाह्य होण्यापासून रोखतील, असेही ते म्हणाले.