पुणे : जागतिक स्तरावरील मराठी गुणवंतांना एकत्र आणणारे आणि गोव्यातील सांस्कृतिक विश्वासाठी ऐतिहासिक ठरणारे ‘जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा २०२६’ यंदा गोव्याची राजधानी पणजी येथे होणार आहे.
जागतिक मराठी अकादमी, गोवा मराठी अकादमी, गोमन्तक साहित्य सेवक मंडळ, इन्स्टिट्यूट मिनिझेस ब्रागांझा (आयएमबी) आणि बिल्वदल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते ११ जानेवारीस होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची निवड करण्यात आली आहे.
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि प्रख्यात कवी रामदास फुटाणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘जागतिक मराठी संमेलनाचे हे २१ वे वर्ष आहे. गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मराठी भाषेला मोलाचे स्थान आहे. गोव्यातील सांस्कृतिक परंपरा आणि मराठी यांचा संगम अधिक दृढ व्हावा, यासाठी हे संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे. विविध उपक्रम, चर्चासत्रे व वैचारिक मैफलींमुळे मराठीचा विकास अधिक व्यापक प्रमाणावर होईल,’ असा विश्वास फुटाणे यांनी व्यक्त केला.
संमेलनादरम्यान परिसंवाद, काव्यवाचन, चर्चासत्रे, नाट्यप्रयोग तसेच मराठीशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. गोव्यातील विविध संस्था, लेखक, कवी, कलाकार आणि वाचक मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. मराठी उद्योग, कला व संस्कृती यांचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा आणि नवीन पिढीला प्रेरणा मिळावी हा या संमेलनामागील मुख्य उद्देश असल्याचे फुटाणे यांनी स्पष्ट केले.