पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून पुण्यात ९ ते १२ जून या कालावधीत होणाऱ्या ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे, दृष्टिहीनांना चित्र पाहण्याची ब्रेल लिपीतून संधी उपलब्ध करून देणारे चित्रकार चिंतामणी हसबनीस आणि ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी गुरुकुल संस्थेला पुलंच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

देशपांडे कुटुंबीयांच्या सहकार्याने होत असलेल्या आणि करोना काळात खंडित झालेला पुलोत्सव यानिमित्ताने पुनरुज्जीवित होत असल्याची माहिती पुलोत्सवाचे निमंत्रक आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे विभागीय प्रमुख सुशील जाधव, ‘स्किन सिटी’चे डॉ. नितीन ढेपे, बेलवलकर हौसिंगचे समीर बेलवलकर, कार्टुनिस्ट कंबाईनचे चारुहास पंडित, लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनच्या आभा औटी, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.