पुणे : विवाह समारंभातून दोन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विवाह समारंभातून दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हवेली तालुक्यातील नायगाव परिसरात राहायला आहेत. १६ नोव्हेंबर रोजी लोणी काळभोरमधील कुंजीरवाडी भागात एका कार्यालयात तक्रारदाराच्या नातेवाईकांचा विवाह समारंभ होता.

तक्रारदाराची पत्नी विवाह समारंभासाठी गेली होती. त्यांच्या पत्नीने पिशवीत दागिने ठेवले होते. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार माने तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात लोणी काळभोर भागातील एका मंगल कार्यालयातून एका महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला जाण्याची घटना घडली होती.

डेक्कन जिमखाना भागात मोटारीतून दागिने चोरी

मोटार चालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी एक लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली. याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या शिरुर तालुक्यातील केंदूर गावच्या रहिवासी आहेत. त्या कुटुंबीयांसोबत डेक्कन जिमखाना परिसरातील एका हाॅटेलमध्ये आल्या होत्या. मोटार त्यांनी हाॅटेलच्या परिसरात लावली होती. त्यावेळी मोटार चालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मोटारीत ठेवलेले एक लाख १५ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. सहायक फौजदार डेंगळे तपास करत आहेत.

पीएमपीएमएल प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

पीएमपीएमएल प्रवासी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना कात्रज भागात घडली. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहेत.

१६ ऑक्टोबर रोजी त्या कात्रज बस स्थानक ते धनकवडी दरम्यान पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. प्रवासात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी जमदाडे तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएमएल प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुणे शहर परिसरात पीएमपीएमएल प्रवासी महिलांकडील लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले आहेत. पीएमपीएमएल प्रवासी महिलांकडील दागिने चोरीच्या घटना विचारात घेता अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे. शहरातील गर्दीच्या पीएमपीएमएल स्थानके, तसेच एसटी स्थानकांच्या परिसरात दागिने चोरणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.