पुणे : तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ५३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिनाभरात तुळशीबागेत महिलांच्या पर्समधून ऐवज लांबविण्याची ही तिसरी घटना आहे.
याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार मूळच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा गावातील आहेत. गौरी-गणपतीचे साहित्य खरेदीसाठी त्या बहिणींसोबत तुळशीबागेत १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास आल्या होत्या. तुळशीबागेतील एका दुकानात त्या गौरीचे मुखवटे पाहत होत्या. त्या वेळी गर्दीत चोरट्याने त्यांच्या पर्समधून ५३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज लांबविला. खरेदीनंतर पर्सची तपासणी केली तेव्हा पर्समधून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. गेल्या काही दिवसांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हवालदार पडघमकर तपास करत आहेत.
तुळशीबागेतील चोरी, गैरप्रकार, तसेच संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. सणासुदीच्या काळात तुळशीबागेत मोठ्या संंख्येने शहर, जिल्हा, तसेच परगावाहून महिला खरेदीसाठी येतात. या काळात महिलांकडील पर्समधील ऐवज लांबविण्याच्या घटना घडल्याने पोलिसांनी चोरट्यांना पकडावे, अशी मागणी तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी केली आहे.
ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरीला
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना महापालिका भवन परिसरात घडली. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सदाशिव पेठेतील रेणुकास्वरूप शाळेजवळील एका सोसायटीत राहायला आहेत. रविवारी (११ ऑगस्ट) देहूरोड परिसरातील किवळे येथे राहणाऱ्या भावाकडे राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या. दुपारी दीडच्या सुमारास त्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र लांबविले. हवालदार भापकर तपास करत आहेत.
घरकाम करणाऱ्या महिलेने रोकड लांबविली
घरकाम करणाऱ्या महिलेने दीड लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना कोंढव्यातील एका सोसायटीत घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कोंढव्यातील साळुंखे विहार रस्त्यावर असलेल्या रोझ ॲव्हेन्यू सोसायटीत राहायला आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याकडे घरकामास एक महिला यायची. ज्येष्ठ महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने शयनगृहातील कपाटातील एक लाख ५३ हजारांची रोकड लांबविली. रोकड लांबविल्यानंतर महिला कामावर आली नाही. महिलेने रोकड लांबविल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गु्न्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.