लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : दर वर्षी उन्हाळ्यात विड्याच्या पानांचे दर वाढतात. यंदा देशभराला उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत असतानाही परराज्यांतून चांगली आवक होत असल्यामुळे राज्यात विड्याच्या पानांचे दर आवाक्यात आहेत.
उन्हाळ्यात वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे विड्याच्या (नागवेली) पानांच्या वेलींची वाढ थांबते. लहान आकाराची पाने तयार होतात. लहान आकाराची पाने बाजारात येत असतात. पानांच्या उत्पादनांवरही परिणाम होते. त्यामुळे दर वर्षी राज्यात पानांचा तुटवडा असताना आंध्र प्रदेशातून कळी आणि फाफडा पानांची राज्यात आवक होते. साधारण मार्चच्या सुरुवातीपासून मेअखेरपर्यंत राज्यात येतात. सध्या आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर पानांची आवक होत असून, त्यांची शेकडा ८० रुपये दरांनी किरकोळ विक्री सुरू आहे, अशी माहिती पानांचे व्यापारी नीलेश खटाटे यांनी दिली.
आणखी वाचा-पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
उन्हाळ्यात ओदिशामधून येणाऱ्या बनारस आणि कलकत्ता पानांची आवकही कमी होते. सध्या ओदिशातून येणाऱ्या पानांची आवकही रोडावली आहे. ओदिशातून येणारे बनारस पान शेकडा १४० ते १६०, तर कलकत्ता पानांची ३०० ते ३२० रुपये शेकड्याने किरकोळ विक्री सुरू आहे. साधारण मे महिन्याच्या सुरुवातीपासून ओदिशातून येणाऱ्या पानांची आवक वाढण्याची शक्यताही नीलेश खटाटे यांनी व्यक्त केली आहे.
पुणे पानांचे दर उतरले
दर वर्षी उन्हाळ्यामुळे मिरज परिसरात उत्पादित होणाऱ्या पुणे पानांची (कळी आणि फाफडा) आवक कमी होते. यंदा म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्यामुळे मिरज परिसरातून ऐन उन्हाळ्यातही पानांचे चांगले उत्पादन होत आहे. पण, परराज्यांतून होत असलेल्या आवकेमुळे मिरज परिसरातील पानांना कमी दर आहे, अशी माहिती नरवाड (जि. सांगली) येथील पानउत्पादक भाऊसो नागरगोजे यांनी दिली.
विड्याचे दर स्थिर
आंध्र प्रदेशातून आवक वाढल्यामुळे कळी आणि फाफडा पानांचा फारसा तुटवडा नाही. पण, बनारस आणि कलकत्ता पानांचा तुटवडा जाणवत आहे. बनारस आणि कलकत्ता पानांचा दर्जा कमी असूनही दर चढे आहेत. पानासाठी लागणाऱ्या इतर साहित्याच्या दरात वाढ झाली नसल्यामुळे पानांचे दर स्थिर आहेत, अशी माहिती पानटपरी चालक चंद्रशेखर पुजारी यांनी दिली.