पुणे: रेल्वेने आता प्रवाशांना स्वस्तात जेवण देण्यास सुरूवात केली आहे. सर्वसाधारण डब्यांसमोर अतिशय कमी दरात प्रवाशांना जेवण दिले जात आहे. याची सुरूवात पुण्यासह देशभरातील ६४ रेल्वे स्थानकांवर झाली आहे. याचबरोबर पिण्याचे पाणीही प्रवाशांना माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहे.

रेल्वे मंडळाने परडवणाऱ्या दरात प्रवाशांना जेवण उपलब्ध करुन देण्याचे आदेश रेल्वेच्या सर्व विभागांना दिले होते. रेल्वे स्थानकावर सर्वसाधारण डबे जिथे थांबतात त्या ठिकाणी फलाटावर ही सुविधा देण्यास सांगण्यात आले होते. प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सहा महिने चालवावी, असेही निर्देश देण्यात आले होते. यानुसार, आयआरसीटीसीकडे या योजनेची अंमलबजावणी देण्यात आली. यानुसार पुणे स्थानकावर ही सुविधा सुरू झाली आहे. आता रेल्वे प्रवाशांना फलाटावरच २० व ५० रूपयांत पोटभर जेवण मिळच आहे. याचबरोबर त्यांना २ रुपयांत दोनशे मिली पाणीही मिळत आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू असलेल्या पिंपळे सौदागर येथे रस्ता खचला, जीवितहानी नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मध्य रेल्वेच्या पुण्यासह नागपूर, भुसावळ, मनमाड, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि खांडवा स्थानकावर ही सुविधा सुरू झाली आहे. आगामी काळात इतर स्थानकांवर ही सुविझा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ.रामदास भिसे यांनी दिली.

जेवण २० रुपये
७ पुरी (१७५ ग्रॅम), बटाट्याची सुकी भाजी (१५० ग्रॅम) आणि लोणचे (१२ ग्रॅम)

नाश्ता ५० रूपये (३५० ग्रॅम)
दक्षिण भारतीय भात, राजमा अथवा छोले आणि भात, खिचडी, छोले आणि भटुरे अथवा कुलचे, पाव भाजी, मसाला डोसा (यापैकी एक पदार्थ)