पुणे : पेट्रोल, डिझेलवरील कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याने पेट्रोल पंपचालकांची दिवाळी यंदा गोड झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून पेट्रोल पंपचालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ झालेली नव्हती. त्याचा आर्थिक फटका पंपचालकांना बसत होता. अखेर पंपचालकांच्या मागणीला यश येऊन त्यांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये प्रतिलिटर पेट्रोलसाठी ६५ पैसे आणि डिझेलसाठी ४४ पैसे वाढ झाली आहे.

अपूर्व चंद्रा समितीने पंपचालकांच्या कमिशनचा दर सहा महिन्यांनी आढावा घेण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. तरीही पेट्रोलिअम कंपन्यांकडून २०१७ पासून पेट्रोल पंपचालकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती. पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. यासाठी शासकीय पातळीवर अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलनही करण्यात आले होते. याचबरोबर लोकप्रतिनिधींना भेटून या मुद्द्यावर आवाज उठविण्याची विनंतीही पेट्रोल पंपचालकांनी केली होती.

हेही वाचा >>>थायलंडमध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर, फुकेतमध्ये ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ लवकरच खुले

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या तीन सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी कमिशनमध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. पेट्रोल पंपचालकांना पेट्रोलिअम कंपन्यांकडून पेट्रोल, डिझेलच्या विक्रीवर प्रतिलिटर कमिशन मिळते. हे कमिशन पुण्यात सध्या प्रतिलिटर पेट्रोलसाठी ३.३० रुपये आणि डिझेलसाठी २.२० रुपये आहे. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. प्रतिलिटर पेट्रोलसाठी ६५ पैसे आणि डिझेलसाठी ४४ पैसे वाढ झाली असून, ती बुधवारपासून लागू झाली. देशभरात सुमारे ९२ हजार पेट्रोल पंप आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार करता सुमारे ९०० पेट्रोल पंप आहेत. या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणतीही वाढ होणार नाही. त्यामुळे या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील पेट्रोल पंपचालकांचे कमिशन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा देशभरातील ९२ हजार पंपचालकांना होणार आहे.– अली दारूवाला, प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन