लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गुलामगिरीची, लाचारीची, आणि अत्याचारांची आठवण करून देणारी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढून टाकावी, अशी समस्त हिंदू समाजाची मागणी आहे. अन्यथा बाबरी ढाच्याप्रमाणे कारसेवा करून ही कबर उदध्वस्त करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शनिवारी देण्यात आला. शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी (१७ मार्च) राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात येणार आहे.

विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चव्हाण म्हणाले, ‘आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी, विश्वासघात आणि हिंदू द्वेष यामध्ये घालविणारा, आपल्या सख्या भावांचे खून करणारा, बापाला कैदेत टाकणाऱ्या, काशी विश्वनाथ, मथुरा, सोमनाथ मंदिरे फोडणारा ,छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे, त्यामुळे कबर हटवली गेली पाहिजे.

महाजन म्हणाले, ‘औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरिया कायद्यानुसार वागत आहेत. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतून प्रेरणा मिळते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मारेकऱ्याची कबर जतन करण्याची आवश्यकता नाही.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकून मारणारा, भावांची क्रूरतेने हत्या करणारा घरातल्या लोकांना सोडत नाही त्याच्यासाठी नागरिक आणि समाजाची काय किंमत असणार? अशा राष्ट्रघातकी, क्रूर आणि हिंसाचारी प्रवृत्तीच्या औरंग्याचा करावा तितका निषेध कमी असेल’, याकडे भेगडे यांनी लक्ष वेधले.