शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत टँकर व्यावसायिकांकडून पाण्याचा काळाबाजार होऊ नये यासाठी टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवण्याची सक्ती आवश्यकच असल्याचे मत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच ही सक्ती लागू करायला प्रशासनाला भाग पाडू अशीही भूमिका आता राजकीय पक्षांनी घेतली आहे.
टँकर व्यावसायिकांना जीपीएस सक्ती करण्याबाबत महापौरांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका बुधवारी स्पष्ट केली.
महापौर दत्तात्रय धनकवडे
सध्याच्या काळात टँकरवर जीपीएस यंत्रणा आवश्यकच आहे. काही चालकांनी ती बसवून घेतली आहे. उर्वरित टँकरवर ती बसवण्याबाबत तसेच या यंत्रणेद्वारे देखरेखीची यंत्रणा महापालिकेने सुरू करण्याबाबत ज्या त्रुटी असतील त्यांचा आढावा घेतला जाईल. लक्षात आलेल्या त्रुटी निश्चितपणे दूर केल्या जातील. त्यासाठी तातडने बैठक घेऊन आवश्यक सूचना प्रशासनाला मी लगेचच देणार आहे.
——-
अरविंद शिंदे
(विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता)
पाणीटंचाईच्या काळात टँकरचालक ज्या पद्धतीने शहरात व्यवहार करतात, ते बघता ते वॉटर माफिया आहेत, हा आरोप आम्ही गेल्यावर्षीही केला होता आणि जीपीएस सक्तीचीही मागणी केली होती. मात्र टँकरलॉबीच्या दबावाखाली प्रशासनाकडून जीपीएस बसवण्याची सक्ती टँकरचालकांना केली जात नाही. पुणेकर पाणीकपातीला तोंड देत आहेत आणि दुसरीकडे टँकरचालकांकडून होणाऱ्या पाण्याच्या चोऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या बाबत महापालिका सभेत आम्ही निश्चितपणे जाब विचारणार.
——-
राजेंद्र वागसकर
(गटनेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
टँकरवर कोणत्याही परिस्थितीत जीपीएस यंत्रणा बसवली गेलीच पाहिजे आणि दर आठवडय़ाला त्याचा प्रशासनाने आढावाही घेतला पाहिजे. तसे होत नसेल तर टँकरचालक आणि प्रशासनातील अधिकारी यांचे साटेलोटे आहे असेच म्हणावे लागेल. पाणीटंचाईच्या काळात पैसा कमावण्याचा उद्योग टँकरचालकांकडून होतो. टँकरचालकांनी पाणी कोठे भरले, टँकर कोणत्या भागात गेला यासह सर्व तपशील सर्व नागरिकांना समजलेच पाहिजेत. त्यासाठी जीपीएस सक्ती लागू करायला लावू.
——-
मुक्ता टिळक
(सदस्य, स्थायी समिती, भाजप)
पाणीटंचाईच्या काळातील टँकरचा काळाबाजार रोखण्यासाठी टँकरवर जीपीएस बसवण्याची सक्ती असलीच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्या दृष्टीने खासगी टँकरचालकांना महापालिकेने जीपीएस यंत्रणा बसवण्याची सक्ती करावी. टँकरवर नियंत्रण नसल्यामुळे पाणी गरजूंना मिळत आहे का नाही ते समजत नाही. त्यामुळे ही सक्ती आवश्यकच आहे.
——-
श्याम देशपांडे
(शहर संघटक, शिवसेना)
टँकरवर जीपीएस सक्ती ही शंभर टक्के अमलात यायलाच पाहिजे. शहरात जी पाणीकपात करण्यात आली आहे, त्या परिस्थितीत या सक्तीची गरज आहे. या सक्तीमुळे पाण्याचा काळाबाजार थांबवणे शक्य होणार आहे. त्या दृष्टीने महापालिकेने ही सक्ती करावी. ती स्वागतार्हच ठरेल. या सक्तीमुळे जे खरे गरजू आहेत त्यांना पाणी मिळू शकेल.
——-
डॉ. सिद्धार्थ धेंडे
(गटनेता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया)
सद्यपरिस्थितीत पाण्याची बचत जशी महत्त्वाची आहे, तितकेच महत्त्व पाण्याचा दुरुपयोग थांबवणे, पाण्याची चोरी थांबवणे यालाही आहे. त्या दृष्टीने टँकरवर जीपीएस यंत्रणा बसलीच पाहिजे. या सक्तीमुळे पाण्याची चोरी व गैरवापर थांबणार आहे. तसेच या यंत्रणेचे महत्त्व म्हणजे पाणीवितरण, प्रत्यक्ष पुरवठा यात पारदर्शकता येणार आहे.